Coronavirus: लॉकडाऊनच्या समाप्तीसाठी केंद्रीय मंत्र्यांची चर्चा, रेल्वे सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 03:37 PM2020-04-05T15:37:01+5:302020-04-05T15:38:24+5:30
‘लॉकडाऊन’ला एक आठवडाही पूर्ण होण्याआधीच अशी शक्यता वर्तविणाऱ्या गावगप्पांवर आधारित अफवा व वदंता सुरू झाल्याने सरकारने त्यांचे ठामपणे खंडन करून हे सर्व निराधार असल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या सुरू असलेले देशव्यापी ‘लॉकडाऊन’ येत्या १४ एप्रिलच्या मध्यरात्री संपल्यानंतर हे सर्वंकष निर्बंध आणखी एक आठवड्याने वाढविण्याची शक्यता केंद्र सरकारने सोमवारी स्पष्टपणे फेटाळून लावली. त्यानंतर, आता केंद्रीय मंत्र्यांची टीम देशातील लॉकडाऊन हटविण्यासाठी विचारविमर्श करत असल्याचे वृत्त द संडे एक्सप्रेसने दिले आहे. संरक्षणमंत्रीराजनाथ सिंह हे याा टीमचे नेतृत्व करत असल्याची माहिती आहे.
‘लॉकडाऊन’ला एक आठवडाही पूर्ण होण्याआधीच अशी शक्यता वर्तविणाऱ्या गावगप्पांवर आधारित अफवा व वदंता सुरू झाल्याने सरकारने त्यांचे ठामपणे खंडन करून हे सर्व निराधार असल्याचे म्हटले आहे. पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) एका टष्ट्वीटमध्ये म्हटले की, आम्ही अशा प्रकारच्या बातम्या व वदंता कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या निदर्शनास आणल्या; तेव्हा त्यांनी आश्चर्य व्यक्त करून त्या पूर्णपणे निराधार असल्याचे सांगितले. ‘लॉकडाऊन’ची मुदत वाढविण्याचा कोणताही विचार नाही. त्यानंतर, आता केंद्रीय मंत्र्यांकडून लॉकडाऊनबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अधिक काळासाठी लॉकडाऊन ठेवता येत नसल्याचं अनेक मंत्र्यांनी म्हटलं आहे.
देशातील ७०० जिल्ह्यांपैकी २०० पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे संकट दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर या सर्वच जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. दैनिक भास्कर वृत्त समुहाने, १४ एप्रिलनंतर देशातील रेल्वेसेवा सुरळीत सुरु होईल की नाही, याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याचे वृत्त दिले आहे. त्यामुळे १५ एप्रिलपासून रेल्वे सेवा सुरु होईल की नाही, हे अद्याप ठरलं नसल्याचंही वृत्त आहे. ‘लॉकडाऊन’चे बऱ्यापैकी पालन होत असतानाच विविध राज्यांमधून हजारो स्थलांतरित कामगारांचे तांडे घराकडे परतत असल्याच्या बातम्यांनी देशभर गहजब झाला होता. त्यानंतर, ‘लॉकडाऊन’ पाळला नाही, तर या धोक्यापासून देशाला वाचविणे कठीण होऊन बसेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होते.
दरम्यान, भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 3500 वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील 99 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका हा 21 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांना असल्याची माहिती समोर आली आहे.