CoronaVirus Update: कोरोनाचे नवे रुग्ण ५८ हजारांहून अधिक; दोन लाख जणांवर उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 05:28 AM2022-01-06T05:28:06+5:302022-01-06T05:28:16+5:30

ओमायक्रॉनचे दोन हजार बाधित. कोरोनाची सौम्य किंवा मध्यम लक्षणे असणाऱ्यांचा घरातील विलगीकरणाचा कालावधी दहा दिवसांवरून सात दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

CoronaVirus Update: More than 58,000 new corona patients; Two lakh people under treatment | CoronaVirus Update: कोरोनाचे नवे रुग्ण ५८ हजारांहून अधिक; दोन लाख जणांवर उपचार सुरू

CoronaVirus Update: कोरोनाचे नवे रुग्ण ५८ हजारांहून अधिक; दोन लाख जणांवर उपचार सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे ५८ हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले असून, ५३४ जणांचा मृत्यू झाला आहे. ओमायक्राॅनच्या बाधितांची संख्या २१३५ झाली असून, त्यातील ८२८ जण बरे झाले. नव्या विषाणूचा संसर्ग  २४ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरला आहे. सक्रिय रुग्णांचा आकडा दोन लाखांवर पोहोचला आहे. 

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण असून, त्यानंतर दिल्ली, केरळ. राजस्थान, गुजरात, तमिळनाडूचा क्रमांक लागतो. गेल्या चोवीस तासांत देशात कोरोनाचे ५८,०९७ नवे रुग्ण सापडले. सक्रिय रुग्णांची आकडेवारी २,१४,००४ झाली आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण ०.६१ टक्के आहे. या संसर्गाने आजवर ४ लाख ८२ हजार ५५१ जणांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३ कोटी ५० लाख १८ हजार ३५८ असून, त्यातील ३ कोटी ४३ लाख २१ हजार ८०३ जण बरे झाले. 
कोरोनातून आजवर ९८.०१ टक्के जण बरे झाले. दररोजचा व दर आठवड्याचा संसर्गदर अनुक्रमे ४.१८ व २.६० टक्के तसेच मृत्यूचे प्रमाण १.३८ टक्के आहे. देशातील नागरिकांना कोरोना लसीचे आजवर १४७.७२ कोटी डोस देण्यात आले आहेत.

सौम्य लक्षणे असलेल्यांना आता सात दिवस विलगीकरण
कोरोनाची सौम्य किंवा मध्यम लक्षणे असणाऱ्यांचा घरातील विलगीकरणाचा कालावधी दहा दिवसांवरून सात दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे. केंद्र सरकारने प्रतिबंधक उपायांसंदर्भात जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा बदल करण्यात आला. घरातील विलगीकरण संपल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. 

उपचारांसाठी नवे औषध
कोरोना उपचारांमध्ये मोलनुपिराविर या औषधाच्या आपत्कालीन वापराला भारतात परवानगी देण्यात आली आहे. या औषधाची गोळी विषाणूला शरीरात आणखी पसरण्यापासून रोखते. त्यामुळे तब्येत लवकर बरी होण्यास मदत होते. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसारच या औषधाचा वापर करण्यात यावा अशी सूचनाही देण्यात आल्या आहेत. 
 

Web Title: CoronaVirus Update: More than 58,000 new corona patients; Two lakh people under treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.