Coronavirus : चीनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचा १४ दिवस दिल्लीतच मुक्काम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 07:44 PM2020-02-03T19:44:41+5:302020-02-03T19:46:48+5:30
Coronavirus Update : लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू; दिवसातून तीन वेळा होते तपासणी
गडचिरोली: अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कोरोना विषाणूपासून बचावासाठी अखेर मायदेशी परतलेल्या चीनमधील भारतीय विद्यार्थ्यांना सध्या दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्यांना १४ दिवस वैद्यकीय निगराणीखाली राहावे लागणार आहे. यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
चीनमधील वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणानिमित्त गेलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या पुढाकाराने विशेष विमानांनी भारतात आणण्यात आले. त्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
गडचिरोलीचे रहिवासी आणि सध्या आमगाव (जि.गोंदिया) येथे कार्यरत असणारे तहसीलदार दयाराम भोयर यांची कन्या सोनाली हिच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तसेच पुणे, नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थी भारतात परतले आहेत. त्यांना दिल्लीत आणल्यानंतर तेथील लष्कराच्या रुग्णालयात विशेष कक्षात ठेवण्यात आले आहे. तिथे दिवसातून तीन वेळा त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यांच्यापैकी कोणालाही कोरोना व्हायरसची लागण झालेली नसली तरी हा व्हायरस कधीही कार्यरत होण्याची शक्यता पाहता त्यांना १४ दिवस वैद्यकीय निगराणीत ठेवले जात आहे.
राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडूनही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क करून त्यांना धीर देण्यात आला आहे. १४ दिवसांच्या देखरेखीनंतर या विद्यार्थ्यांच्या घरपोच सोडण्याची व्यवस्था सरकारकडूनच केली जाणार असल्याचे सोनाली भोयर हिचे पालक दयाराम भोयर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.