कोरोनाची चौथी लाट आल्यास भारतावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांनी केलं धक्कादायक विधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 08:22 PM2022-03-20T20:22:18+5:302022-03-20T20:23:15+5:30
Coronavirus Updates in India: चीन आणि दक्षिण कोरियासह युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसून आलं आहे.
Coronavirus Updates in India: चीन आणि दक्षिण कोरियासह युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे भारतातही चिंता व्यक्त केली जात आहे. आता दिल्ली एम्सने या मुद्द्यावर मोठं विधान केलं आहे. "SARS-CoV-2 (कोरोनाव्हायरस) हा 'RNA' विषाणू आहे. त्याच्या प्रकारांमध्ये बदल होत राहणार हे नक्की. त्यात एक हजाराहून अधिक बदल झाले आहेत. मात्र, असे केवळ 5 प्रकार समोर आले असून, ते चिंतेचं कारण बनलं आहे", AIIMS दिल्लीचे वरिष्ठ एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. संजय राय म्हणाले.
"गेल्या वर्षी भारताला कोरोना व्हायरसच्या अत्यंत विनाशकारी दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला, जो खूप दुर्दैवी होता. मात्र, आता कोरोना लसीकरणामुळे लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. यासोबतच भारतीयांमध्ये निर्माण होणारा नैसर्गिक संसर्ग ही एक मोठी शक्ती आहे, जी लोकांना दीर्घ काळासाठी चांगले संरक्षण प्रदान करते. भविष्याबद्दल बोलायचे झाल्यास, कोरोनाच्या कोणत्याही लाटेचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाही", असं डॉ. संजय राय म्हणाले.
'मास्क वापर शिथिल करण्याचा सरकार विचार करू शकते'
"सध्याची वेळ अशी आहे की भारत सरकार मास्क वापरण्याचा नियमात शिथिलता आणण्याचा करण्याचा विचार करू शकते. ज्येष्ठ नागरिक आणि संसर्गाचा संशय असलेल्या लोकांनी खबरदारी म्हणून मास्क घालणे सुरू ठेवावं", असं डॉ. राय म्हणाले. भविष्यात कोरोनाव्हायरसचे कोणतेही नवीन प्रकार उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारनं जीनोमिक सिक्वेन्सिंगसह SARS-CoV-2 चं निरीक्षण करणं सुरू ठेवावं, यावरही राय यांनी भर दिला.
'कोरोना भारतात जास्त संसर्गजन्य होणार नाही'
आणखी एक एपिडेमियोलॉजिस्ट डॉ चंद्रकांत लहरिया यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचे नवीन प्रकार भारतात समोर आले असले तरी, भारतात संक्रमितांची संख्या वाढण्याची शक्यता फार कमी आहे. "जर आपण सीरो सर्वेक्षण, लसीकरण कव्हरेज आणि व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिअंटचा प्रसार यांचा डेटा पाहिला, तर असा निष्कर्ष काढता येईल की भारतात कोरोना महामारी संपली आहे. अशा परिस्थितीत पुढील काही महिन्यांपर्यंत भारतात कोरोनाची नवी लाट आणि नवीन रूपे समोर येण्याची शक्यता फारच कमी आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा बहुतेक लोकसंख्येला मास्क घालण्याच्या अनिवार्यतेपासून सूट दिली जाऊ शकते", असं डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणाले.
'लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती विकसित झाली आहे'
सफदरजंग हॉस्पिटलमधील कम्युनिटी मेडिसिनचे प्रमुख डॉ जुगल किशोर यांनीही हेच मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, ''सीरो सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की 80-90 टक्के लोकसंख्येला संसर्ग झाला आहे. म्हणजेच आता भारतीयांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. अशा परिस्थितीत सरकार आता लोकांना मास्क घालण्यासारख्या उपायांमधून सूट देऊ शकते"
लसीकरणावरील नॅशनल कन्सल्टन्सी ग्रुपच्या कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनी देशात लसीकरणाची व्याप्ती जास्त आहे. अशा परिस्थितीत भारतात कोणत्याही नव्या लाटेचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे, असं मत व्यक्त केलं आहे.