Coronavirus Updates: हलगर्जीपणामुळे पुन्हा तेच संकट येण्याची शक्यता; टास्क फोर्सच्या अध्यक्षांचा सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 04:53 AM2021-03-26T04:53:32+5:302021-03-26T04:53:49+5:30
लॉकडाऊनची वर्षपूर्ती : मास्क वापरा, सामाजिक अंतर राखा : डॉ. व्ही.के. पॉल यांचे आवाहन
एस.के. गुप्ता
नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट आणि डबल म्युटंट व्हेरिएंटमुळे विशेषज्ञ काळजीत असून, किंचितही हलगर्जीपणा घातक सिद्ध होऊ शकतो. लॉकडाऊनला एक वर्ष पूर्ण झाले. लोकांनी योग्य मास्क वापरावा, साबणाने हात धुवावेत, सामाजिक अंतर राखावे. याशिवाय लस घेण्यासाठी को-विन ॲपवर नोंदणी करून लसीकरण मोहिमेत भाग घ्यावा, असे आवाहन कोविड-१९ टास्क फोर्सचे अध्यक्ष व नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी केले.
डॉ. पॉल म्हणाले, ‘कोरोनाची पुन्हा लाट येण्याचे मुख्य कारण म्हणजे लोकांनी योग्य पद्धतीने मास्क न वापरणे आणि सामाजिक अंतराचे पालन न करणे होय. याच कारणांमुळे राज्य सरकारांना सणांवर स्थानिक प्रतिबंध लावण्यास सांगण्यात आले आहे. थोडासा हलगर्जीपणा घातक सिद्ध होऊ शकतो.’
डॉ. पॉल कोरोनाच्या डबल म्युटंट व्हेरिएंटविषयी बोलताना म्हटले की, आतापर्यंत हेच समजले आहे की, ‘नवा स्ट्रेन परिणामकारक असला तरी बहुधा सुपरस्प्रेडर नाही. तो घातक असल्याचे पुरावे अजून मिळालेले नाहीत. वैज्ञानिक आणखी काही माहिती मिळाल्यानंतर सांगू शकतील. कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटवर लस परिणाम करणार नाही, असे कारण अजून तरी दिसलेले नाही. नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोलचे संचालक डॉ. सुजितकुमार सिंह म्हणाले की, ‘विषाणूचा एक जेनेटिक कोड असतो. त्याला एक प्रकारचा मॅन्युअल समजावे. विषाणूच्या जेनेटिक कोडमध्ये सतत लहान-लहान बदल होत असतात. बहुतांश बदल निष्क्रिय असतात; परंतु काही बदलांमुळे विषाणू वेगाने पसरतो किंवा घातक ठरू शकतो. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतील व्हेरिएंटला जास्त संक्रमक आणि घातक मानले जात आहे.’
डॉ. सिंह म्हणाले की, ‘ज्या राज्यांत रुग्ण वाढताहेत तेथे वेगळ्या म्युटेशन प्रोफाइलचा पत्ता लागला आहे. जो नवा ‘डबल म्युटंट’ व्हेरिएंट आहे तो जवळपास १५-२० टक्के नमुन्यांत मिळाला आहे. हा आधीच कॅटलॉग केलेल्या व्हेरिएंटशी जुळत नाही. तो महाराष्ट्रातील २०६ आणि दिल्लीतील ९ नमुन्यांत आढळला.’