CoronaVirus: डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यास ७ वर्षांची कैद, ५ लाख दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 05:16 AM2020-04-23T05:16:09+5:302020-04-23T06:54:33+5:30
केंद्र सरकारचा वटहुकूम; हल्ला, सामानाची मोडतोड, दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा
नवी दिल्ली : स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, मारहाण करणे अथवा त्यांना वाईट वागणूक देणे अशा निंद्य घटनांची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने यासाठी कडक कायदा करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. १८९७ च्या ‘साथीचे रोग प्रतिबंधक कायद्या’त यासाठी वटहुकूम काढून दुरुस्ती करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अशात हल्लेही वाढल्याने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाºयांना काम करणे मुश्किल झाले होते.
माहितीमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर हा वटहुकूम लागू होईल. कोरोनाविरुद्धच्या युद्धात डॉक्टर व अन्य आरोग्य कर्मचारी प्रत्यक्ष आघाडीवर लढणारे योद्धे आहेत. त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देण्याची कोणताही घटना अजिबात सहन केली जाणार नाही. डॉक्टर व अन्य कर्मचाºयांवर हल्ला करणे, त्यांच्या सामानाची व वाहनांची मोडतोड करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा ठरविण्यात आला आहे.
रोगप्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती । कठोर शिक्षेची तरतूद
साधी दुखापत झाल्यास गुन्हेगारास तीन महिने ते पाच वर्षांपर्यंत कैद व ५० हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत दंड
गंभीर दुखापत झाल्यास गुन्हेगारास सहा महिने ते सात वर्षांपर्यंत तुरुंगवास व एक ता पाच लाख रुपयांपर्यंत दंड
डॉक्टरांची वाहने, दवाखाने व अन्य सामानाची मोडतोड झाल्यास बाजारभावाहून दुप्पट भरपाईची वसुली
या गुन्ह्यांचा तपास एक महिन्यात व खटला सहा महिन्यांत निकाली काढण्याचे बंधन
अमित शहांशी चर्चेनंतर ‘आयएमए’चे आंदोलन मागे; डॉक्टरांनी दिला होता ‘व्हाइट अॅलर्ट’
मंत्रिमंडळाने या वटहुकुमास मंजुरी देण्याच्या काही तास आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) या देशातील डॉक्टरांच्या सर्वात मोठ्या व सर्वात जुन्या व्यावसायी संघटनेशी व्हिडीओ बैठक घेऊन डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.
शहा यांनी केलेले आवाहन व दिलेले आश्वासन लक्षात घेऊन ‘आयएमए’ने या हल्ल्यांच्या निषेधार्थ आपले प्रस्तावित आंदोलन मागे घेतले. देशातील डॉक्टर बुधवारी रात्री ९ वाजता मेणबत्ती लावून ‘व्हाइट अॅलर्ट’ पुकारला होता. सरकारला जाग न आल्यास गुरुवारी ‘काळा दिवस’ पाळणार होते.
सध्या वाईट संदेश जाऊ नये यासाठी आंदोलन रद्द करण्यात येत असल्याचे ‘आयएमए’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजन शर्मा व मानद सरचिटणीस डॉ. आर. व्ही. अशोकन यांनी जाहीर केले. बैठकीला ‘आयएमए’च्या अन्य पदाधिकाºयांखेरीज केंद्रीय आरोग्य खात्याच्या सचिव प्रीती सुदान व ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’च्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल हेही उपस्थित होते.
या वटहुकुमातून आरोग्यसेवकांच्या सुरक्षेविषयी सरकारची अतूट प्रतिबद्धता व्यक्त होते. या आरोग्य योद्ध्यांच्या सुरक्षेविषयी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान