CoronaVirus: ‘सोशल’ऐवजी फिजिकल डिस्टन्सिंग शब्द वापरा; पंतप्रधान मोदींना पत्राद्वारे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 06:02 AM2020-04-20T06:02:00+5:302020-04-20T07:18:59+5:30
ज्येष्ठ भाषातज्ज्ञ गणेश देवी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
मुंबई : सोशल डिस्टन्सिंग हा शब्द दोन हजार वर्षांपासून आहे. जातीप्रथेच्या नावाखाली अस्पृश्यता म्हणजे विशिष्ट समाजापासून सामाजिक अंतर राखले जाते. त्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ या शब्द प्रयोगाचा वापर केला जायचा. संविधानाने अस्पृश्यता संपुष्टात आणली आणि समाजात वास करून असलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या कुप्रथेला कायमची मूठमाती दिली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगची नाही तर सोशल कनेक्शनची गरज लॉकडाउनच्या काळात आहे. परिणामी सोशल डिस्टन्सिंग ऐवजी फिजिकल डिस्टन्सिंग हा अधिक योग्य शब्द आहे. त्यामुळे भारतातनेही सोशल डिस्टन्सिंग ऐवजी फिजिकल डिस्टन्सिंग किंवा कोरोना डिस्टन्सिंग या शब्दांचा वापर करावा, असे आवाहन भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.
जगभरात समाज शास्त्रज्ञ यांनी याबद्दल आक्षेप घेतल्यानंतर आता जागतिक आरोग्य संघटनेही २० मार्चपासून हा शब्द वापरणे बंद केले आणि सोशल कनेक्टनेस विथ फिजिकल डिस्टन्सिंग या नवीन शब्द प्रयोगाला सुरूवात केली. फिजिकल डिस्टन्सिंग म्हणजे संशयित रुग्ण आणि इतर यांच्यामध्ये संक्रमण होणार नाही इतके अंतर ठेवणे. यासाठी हवे तर कोरोना डिस्टन्सिंग असा थेट शब्दप्रयोग करणे अधिक युक्त ठरेल. जाती प्रथेची सगळी उतरंड, उच्च निचतेची प्रथा सोशल डिस्टन्सिंगच्या सूत्रावर बांधली गेली आहे. म्हणून राज्य शासनाकडून व प्रसार माध्यमांनी हा शब्द प्रयोग थांबवला पाहिजे असेही आवाहन त्यांनी केले. कोरोनानिमित्ताने सोशल कनेक्टची अधिक गरज असताना दिल्लीच्या तबलीग मरकज मधील एका घटनेचे निमित्त करून संबंध कोरोनाला धर्म चिटकवण्याचा जो अश्लाघ्य प्रयत्न झाला तोही वेदनादायक आणि क्लेशदायक आहे. ते रोखण्यासाठी या देशाचे संविधानिक प्रमुख या नात्याने पंतप्रधान म्हणून पुढाकार घेणे अपेक्षित आहे, असे देवी यांनी पत्रात नमूद केले आहे.