CoronaVirus Vaccine Update : आता भारत कोरोना लशीची निर्यात वाढवणार नाही! देशांतर्गत मागणीवर लक्ष केंद्रित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 08:39 AM2021-03-25T08:39:44+5:302021-03-25T08:41:32+5:30
Corona Vaccine Exports: भारतात पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ व्हायरला सुरुवात झाली आहे. बुधवारी आलेल्या आकड्यांनुसार, देशात 47 हजारहून अधिक रुग्ण समोर आले आहेत.
नवी दिल्ली - देशात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरुवात झाली आहे. यामुळे देशांतर्गत कोरोना लसीची CoronaVirus Vaccine मागणी पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केल्याने, आता भारत पुढील काही महिन्यांपर्यंत कोविड-19 लसीच्या निर्यातीला आळा घालण्याची शक्यता आहे. यासंदर्भात एका अधिकाऱ्याने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, भारत विविध देशांना दिलेले वचन पूर्ण करेल. मात्र, देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुढील काही महिने निर्यात वाढवणार नाही. (CoronaVirus : India will not allow covid 19 vaccine exports focus on expanding domestic demand)
आतापर्यंत 6 कोटी 4 लाख डोसची निर्यात -
या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन-तीन महिन्यांनंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. गेल्या 20 जानेवारीपासून भारताने परदेशात कोरोना लस पाठवायला सुरुवात केली होती. त्यानुसार, भारताने आतापर्यंत जवळपास 80 देशांना कोरोनाचे 6 कोटी 4 लाख डोस पाठवले आहेत.
भारतात पुन्हा वाढतायत कोरोना रुग्ण -
भारतात पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ व्हायरला सुरुवात झाली आहे. बुधवारी आलेल्या आकड्यांनुसार, देशात 47 हजारहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. तर 275 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत तब्बल 1,17,34,058 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. यांपैकी 3,68,457 रुग्ण सक्रीय आहेत. तर आतापर्यंत एकूण 1,12,05,160 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1,60,441 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
ब्राझीलमधील व्हेरिएंटही महाराष्ट्रात आढळला -
जिनोम सिक्वेन्सिंग व महाराष्ट्रातील नमुने यांच्या विश्लेषणातून कोरोना विषाणूत म्युटेशन झाल्याचे आढळले आहे. सुरुवातीच्या व्हेरिएंट्सपेक्षा हा म्युटेशन झालेला विषाणू वेगळा आहे. देशात कोरोना व्हेरिएंटच्या ७७१ प्रकरणांचा तपास लागला आहे. त्यात ब्रिटनच्या नव्या व्हेरिएंटचे ७३६ बाधित, द. आफ्रिकेच्या व्हेरिएंटचे ३४ आणि ब्राझील व्हेरिएंटचा १ अशा बाधितांचा समावेश आहे.