कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बक्षीस मिळणार, 'लकी ड्रॉ' सुरू करण्याची सरकारची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 05:29 PM2021-11-22T17:29:58+5:302021-11-22T17:30:33+5:30
कोरोना महामारीच्या विरोधातील लढ्यात लसीकरण मोहिमेवर सरकारनं जोर दिला आहे. लसीकरणाचा वेग वाढला आहे आणि लसीचे डोसही आता चांगल्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहेत.
कोरोना महामारीच्या विरोधातील लढ्यात लसीकरण मोहिमेवर सरकारनं जोर दिला आहे. लसीकरणाचा वेग वाढला आहे आणि लसीचे डोसही आता चांगल्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहेत. पण अजूनही ज्या ठिकाणी लसीकरणाचा वेग कमी आहे अशा ठिकाणी लसीकरणाला गती देण्यासाठी सरकार नवी मोहिम सुरू करण्याचा विचार करत आहे.
पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी सरकारकडून लवकरच साप्ताहिक किंवा मासिक 'लकी ड्रॉ' योजना सुरू केली जाण्याची शक्यता आहे. कोरोना विरोधी लस घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहन आणि जनजागृती निर्माण करण्याच्या रणनितीवर सरकार सध्या काम करत आहे. कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी 'लकी ड्रॉ' योजना सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. जेणेकरुन लोकांमध्ये लस घेण्यास प्रोत्साहन मिळेल आणि लसीकरणाचा वेग देखील वाढेल.
'लकी ड्रॉ'च्या माध्यमातून कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्या नागरिकांना किचन संदर्भातील उपकरणं, रेशन किट, सहलीची तिकीटं किंवा रोखरक्कम स्वरुपात बक्षीस म्हणून दिलं जाऊ शकतं. यासोबतच केंद्रीय आरोग्य मंत्रालय ज्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण केलं आहे असा संस्था व कंपन्यांचाही बक्षीस देऊन सन्मान करण्याच्या विचारात आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडून याबाबतचे सल्ले देखील मागविण्यात येणार आहेत.
लसीकरणाबाबत लोकांना प्रोत्साहन आणि जनजागृती निर्माण करण्यासाठी संस्थांची मदत घेण्याचाही सरकारचा विचार आहे. तसंच एखाद्या लोकप्रिय व्यक्तीला लसीकरणाचा ब्रँड अॅम्बेसेडर करण्याचा सरकारचा मानस आहे. तसंच घरोघरी जाऊन लसीकरणाची माहिती घेण्याचीही शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या ८२ टक्के नागरिकांना कोरोना विरोधी लसीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे. तर देशात आतापर्यंत ४३ टक्के लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झालं आहे. १२ कोटीहून अधिक लोक असेही आहेत की ज्यांनी अद्याप कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्यास विलंब केला आहे.