Coronavirus : नवीन व्हॅक्सिन पॉलिसी ठरली फायदेशीर! मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये दुप्पट लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 09:09 AM2021-07-02T09:09:05+5:302021-07-02T09:09:43+5:30
Coronavirus : मे महिन्यात सरकारने 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना लस देण्याचा निर्णय घेतला होता.
नवी दिल्ली : कोरोना विरोधात सुरू असलेल्या लसीकरणाची आकडेवारी चांगली दिसून येत आहे. मे महिन्यात कमी झालेल्या या लसीकरणाची गती जूनमध्ये पुन्हा वाढली आहे. मेच्या तुलनेत जूनमध्ये दररोज सरासरी दुप्पट लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच, मे ते जून या कालावधीत मासिक लसीकरणात 97 टक्के वाढ झाली आहे. या काळात दररोज होणाऱ्या लसीकरणात 102 टक्के वाढ झाली आहे.
30 मे रोजी केंद्र सरकारने देशाला आश्वासन दिले होते की, जूनमध्ये 11 कोटी 95 लाख 70 हजार लसींच्या डोसचा पुरवठा केला जाईल. तर जूनमध्ये दररोज 39 लाख 88 हजार 979 च्या सरासरीपेक्षा 11 कोटी 96 लाख 69 हजार 381 डोस देण्यात आले. तर, मे महिन्यात दररोज 19 लाख 69 हजार 580 च्या सरासरीत ही आकडेवारी 6 कोटी 10 लाख 57 हजार 003 इतकी होती. मे महिन्यात सरकारने 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना लस देण्याचा निर्णय घेतला होता.
एप्रिलच्या तुलनेत जूनमध्ये लसीकरणात 33.15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये दररोज 29 लाख 95 हजार 724 डोसच्या सरासरीने एकूण 8 कोटी 98 लाख 71 हजार 739 लोकांना लस देण्यात आली. मे महिन्यात वेगाने घट होणाऱ्या लसीकरणाच्या आकडेवारीमुळे राज्य सरकारांना केंद्र सरकारच्या या प्रक्रियेवर पुन्हा नियंत्रण करण्यासाठी विनंती करावी लागली.
याआधी मे ते 20 जून या दरम्यान देशात विकेंद्रीकृत धोरणावर काम केले जात होते. त्याअंतर्गत खासगी रुग्णालये व राज्य सरकारांना 18 ते 44 वयोगटातील 50 टक्के लसची व्यवस्था करावी लागली. तर 45 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील केंद्राकडून ही लस मोफत दिली जात होती. 21 जूनपासून लागू करण्यात आलेल्या नवीन लसीकरण धोरणामुळे 30 जूनपर्यंत म्हणजेच केवळ 10 दिवसात लसीकरणाची गती वाढल्याचे दिसून आले. आकडेवारीनुसार जून महिन्यातील 44 टक्के लसीकरण जून महिन्याच्या दहा दिवसांतच पूर्ण झाले होते.
अजून लसीकरण बाकी
देशात अद्याप वयस्क लोकांचे लसीकरण बाकी आहे. याचबरोबर, जनगणना 2011 च्या अंदाजानुसार, एकूण 136.13 कोटी भारतीय लोकांचे लसीकरण करण्याचे अंतिम लक्ष्य आहे. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, 33 कोटी 57 लाख 16 हजार 019 म्हणजेच 35.7 टक्के लोकांचे पूर्ण किंवा अंशतः लसीकरण झाले आहेत. तर, 6.34 टक्के लोकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. म्हणजेच, अद्याप भारतात 60 कोटी 44 लाख 83 हजार 981 लोकांनी लस घेतलेली नाही.