Coronavirus: काही आठवड्यांतच भारतातही लस मिळेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशावाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 01:11 AM2020-12-05T01:11:09+5:302020-12-05T07:43:26+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाल्यानंतर अनेक अफवा पसरू शकतात. त्यांना जनतेने बळी पडू नये.
नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना लस येत्या काही आठवड्यांत उपलब्ध होण्याची शक्यता असून, वैज्ञानिकांनी हिरवा कंदिल दिल्यानंतर लसीकरण मोहिमेला सुरूवात होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत सांगितले.
देशातील कोरोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत मोदी म्हणाले की, कोरोना लसीची किंमत किती असावी, तिचे वितरण कसे करावे यासंदर्भात राज्यांशी चर्चा सुरू आहे. सार्वजनिक आरोग्याचे हित लक्षात घेऊनच यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. कोरोना संसर्गाशी मुकाबला करणारे डॉक्टर व अन्य आरोग्यसेवक, वयोवृद्ध नागरिक आदींना प्राधान्याने कोरोना लस दिली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, अनेक कंपन्यांच्या लसींची नावे सध्या चर्चेत आहेत. मात्र स्वस्त दरातील प्रभावी कोरोना लस विकसित होण्याकडे अनेकांचा कटाक्ष आहे. त्यासाठी जगातील अनेक देशांचे डोळे सध्या भारताकडे लागले आहेत. स्वदेशी बनावटीच्या तीन कोरोना लसीच्या चाचण्या सध्या विविध टप्प्यात आहेत. एकूण ८ कोरोना लसींच्या चाचण्या भारतात सुरू असून त्यांचे उत्पादनही देशात होणार आहे.
अफवांना बळी पडू नका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाल्यानंतर अनेक अफवा पसरू शकतात. त्यांना जनतेने बळी पडू नये. त्याऐवजी कोरोना संसर्ग कसा फैलाविणार नाही याबद्दल जागृती करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत.