कोरोना लसीच्या बूस्टर डोससाठी नवीन नोंदणी करावी लागणार नाही, शुल्क 150 रुपयांपेक्षा जास्त नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 02:58 PM2022-04-09T14:58:00+5:302022-04-09T14:58:37+5:30
coronavirus vaccine booster dose : या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिवांनी शनिवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या.
नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायच्या संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी आता 18 ते 59 वर्षे वयोगटातील लोकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बूस्टर डोस 10 एप्रिलपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होईल. या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिवांनी शनिवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या.
केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांच्या आरोग्य सचिवांना सांगितले आहे की, खाजगी लसीकरण केंद्रांनी कोरोना लसीच्या बूस्टर डोस लोकांना देताना 150 रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारू नये. हे 150 रुपयांचे कमाल शुल्क कोरोना लसीच्या किमतीपेक्षा वेगळे असेल. तसेच, ज्या व्यक्तीला लसीचा पहिला आणि दुसरा डोस मिळाला आहे, त्याच व्यक्तीला लसीचा बूस्टर डोस घेता येणार आहे. बूस्टर डोससाठी कोणतीही नवीन नोंदणी करावी लागणार नाही. कोविन अॅपवर आधीच केलेल्या नोंदणीद्वारे बूस्टर डोस दिला जाईल, असेही केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले.
खाजगी लसीकरण केंद्रांमध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाचा बूस्टर डोस उपलब्ध करून दिला जाईल. ही सुविधा सर्व खाजगी लसीकरण केंद्रात उपलब्ध असेल,अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दुसरीकडे, लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने म्हटले आहे की, पात्र लोकांसाठी त्यांच्या कोविशील्ड लसीच्या बूस्टर डोसची किंमत प्रति डोस 600 रुपये असेल.
सध्या देशात कोरोना लसीचे वेगवेगळे डोस कोणत्याही व्यक्तीला देण्याची परवानगी नाही, याचा अर्थ बूस्टर डोस हा त्याच लसीचा असेल जो पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये देण्यात आला होता. दरम्यान, बूस्टर डोसबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटरवर म्हटले होते की, "कोरोनाविरुद्धची लढाई आता अधिक मजबूत होईल. आता 18 वर्षांवरील नागरिकांना 10 एप्रिलपासून खासगी केंद्रांमध्ये बूस्टर डोस घेता येणार आहेत. ज्या नागरिकांना लसीचा दुसरा डोस घेऊन 9 महिने झाले आहेत, ते बूस्टर डोससाठी पात्र असतील."