Coronavirus Vaccine : Covishield पाठोपाठ Covaxin लसीचे दरही कमी; भारत बायोटेकने केली महत्त्वाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 06:00 PM2021-04-29T18:00:24+5:302021-04-29T18:02:38+5:30
सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत लसीकरण महत्त्वाचं मानलं जात आहे.
सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत लसीकरण महत्त्वाचं मानलं जात आहे. १ मे पासून केंद्र सरकारनं १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण हा पर्याय असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी लस उत्पादक कंपन्यांच्या झालेल्या बैठकीनंतर सरकारनं एकूण लस उत्पादनाच्या ५० टक्के लसी खुल्या बाजारपेठेत विकण्याची मुभा दिली होती. त्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी आपल्या लसीचे दर जाहीर केले होते. परंतु एकाच लसीचे तीन दर का असं म्हणत अनेकांनी त्यावर टीका केली होती. तसंच लसीचे दर कमी करण्याची मागणी अनेक स्तरातून होत होती. अशा परिस्थितीत बुधवारी सीरमनं आपल्या कोविशिल्ड या लीसचे राज्यांसाठी दर कमी केले होते. त्यानंतर गुरूवारी भारत बायोटेकनं आपल्या कोवॅक्सिन या लसीचे राज्यांसाठी दर कमी केले आहेत. भारत बायोटेकही आपली लस राज्यांना आता ४०० रूपये प्रति डोस या दरात उपलब्ध करून देणार आहे.
बुधवारी सीरम इन्स्टिट्यूटनं राज्यांना देण्यात येणाऱ्या कोविशिल्ड या लसीचे दर कमी केले होते. त्यानंतर गुरूवारी भारत बायोटेकनं आपल्या लसीचे दर कमी केले आहेत. भारत बायोटेक आता राज्यांना ४०० रूपये प्रति डोस या दरात लस उपलब्ध करून देणार आहे. भारत बायोटेकनं एक पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली.
Covaxin to be available to State governments at a price of Rs 400 per dose: Bharat Biotech pic.twitter.com/gPPFN7mJQo
— ANI (@ANI) April 29, 2021
सीरमनं केले होते दर कमी
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने राज्यांना देण्यात येणाऱ्या कोविशिल्ड लशीची प्रतिकुपी किंमत १०० रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे ही लस आता ३०० रुपयांना उपलब्ध होणार आहे. व्यापक जनहिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे ट्विट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी केलं होतं. नुकत्याच झालेल्या दरपत्रकानुसार ‘सीरम’ची कोविशिल्ड लस राज्यांना ४०० रुपयांना दिली जाणार होती. त्यावरून राज्यांकडून मोठा आक्षेप घेण्यात आला होता. खासगी रुग्णालयांत हीच लस ६०० रुपयांना उपलब्ध होणार होती. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेली ही कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लस ‘सीरम’तर्फे भारतात उत्पादित करण्यात येत आहे. १ मे पासून सुरू करण्यात येणाऱ्या व्यापक लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह काही राज्यांनी सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला लसींची ऑर्डर दिली आहे.