सरकार आणि सर्वसामान्यांन्याना एवढ्या किमतीत मिळणार कोरोनावरील लस, अदर पूनावाला यांची मोठी घोषणा
By बाळकृष्ण परब | Published: January 3, 2021 06:05 PM2021-01-03T18:05:56+5:302021-01-03T18:08:51+5:30
Corona Vaccine Update : कोविशिल्ड या लसीचे उत्पादन होत असलेल्या सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदार पूनावाला यांनी कोरोनाच्या लसीच्या किमतीबाबत मोठी घोषणा केली आहे.
नवी दिल्ली - नव्या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनावरील लसींना मान्यता मिळाल्याने कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीच्या छायेत वर्षभर जगत असलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र कोरोनावरील लस ही मोफत मिळणार की विकत घ्यावी लागले आणि विकत घेतली तर तिची किंमत असेल असे प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. दरम्यान, कोविशिल्ड या लसीचे उत्पादन होत असलेल्या सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदार पूनावाला यांनी कोरोनाच्या लसीच्या किमतीबाबत मोठी घोषणा केली आहे.
अदार पूनावाला यांनी कोरोनाच्या लसीच्या किमतीबाबत माहिती देताना सांगितले की, सीरम इन्स्टिट्युटमध्ये तयार होत असलेली ऑक्सफर्डची कोरोनावरील लस सरकारला २०० रुपयांमध्ये दिली जाईल. तर सर्वसामान्य जनतेला ही लस एक हजार रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. पुण्यातील सीरम इन्स्टिस्ट्यूटमध्ये ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका यांनी तयार केलेल्या कोविशिल्ड या लसीचे उत्पादन सुरू आहे.
दरम्यान, डीसीजीआयचे संचालक व्ही.जी. सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी ट्वीट करत आपला आनंद व्यक्त केला. "नव्या वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. लस संकलनासाठी सीरम इन्स्टिट्यूटनं पत्करलेल्या सर्व जोखीमांनांतर अखेर यश मिळालं. करोनावर मात करणारी कोविशिल्ड ही पहिली लस असून तिच्या वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असून पुढील आठवड्यापासून ती देण्यास तयार आहे," असं ट्वीट अदर पुनावाला यांनी केलं. या ट्वीटसोबतच अदर पुनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, बिल गेट्स, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर, ऑक्सफर्डसह अनेकांचे आभार मानले.
शनिवारीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (उऊरउड)च्या कोरोनावरच्या तज्ज्ञ समितीने मान्यता दिली होती. त्यानंतर आता डीसीजीआयकडून परवानगी मिळाली आहे. सोबतच कॅडीलाच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायलाही परवानगी देण्यात आली आहे. सीरम आणि भारत बायोटेकच्या या दोन्ही लसी २ ते ८ डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवण्यात येऊ शकतात, असे डीसीजीआयनं म्हटलं आहे. तसेच, थोडा ताप, वेदना आणि अलर्जी असे परिणाम प्रत्येक लसींमध्ये असतात. या दोन्ही लसी ११० टक्के सुरक्षित आहेत, असं व्ही.जी. सोमाणी म्हणाले.