Coronavirus: 'त्या' पार्ट्यांमध्ये वसुंधरा राजेंनी कनिकासोबत काढलाय 'सेल्फी'; ही पाहा 'घट्ट' मैत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 07:08 PM2020-03-20T19:08:07+5:302020-03-20T19:10:55+5:30
कनिका कपूरने रविवारी लखनऊमध्ये एक पार्टी आयोजित केली होती. त्यात अनेक बडे अधिकारी आणि काही नेतेमंडळीही उपस्थित होती.
लखनौ - 'बेबी डॉल' या गाण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याची बातमी येताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कारण, लंडनहून परतल्यानंतर काही दिवसांपूर्वीच तिने ३-४ पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती आणि तिथेच 300 ते 400 जणांना ती भेटली होती. हे सगळेच जण कनिकाच्या 'पॉझिटिव्ह' रिपोर्टमुळे गॅसवर आहेत आणि त्यात दोन खासदारांचाही समावेश आहे. त्यापैकी एक फोटो भाजपा नेत्या वसंधराराजे यांचा आहे. या फोटोमुळे वसंधराजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कनिका कपूरने रविवारी लखनऊमध्ये एक पार्टी आयोजित केली होती. त्यात अनेक बडे अधिकारी आणि काही नेतेमंडळीही उपस्थित होती. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे चिरंजीव भाजपा खासदार दुष्यंत सिंह हे देखील या पार्टीला गेले होते. त्यानंतर ते संसदेतही हजर राहिले होते. तिथे अनेकांना भेटले. अगदी, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्येही ते गेले होते. त्यामुळे कनिकाला कोरोनाची लागण झाल्याचं उघड होताच, संसदेत धाकधूक वाढली आहे. दुष्यंत सिंह क्वारंटाईनमध्ये असून आपण सर्वतोपरी खबरदारी घेत असल्याचं ट्विट वसुंधरा राजे यांनी केलंय. आता, वसुंधराराजे यांच्यासमवेतचा कनिका कपूरचा फोटो समोर आला आहे. त्यामुळे, कनिका आणखी किती बड्या नेत्यांच्या किंवा सेलिब्रिटींच्या संपर्कात आली होती, याची चर्चा रंगली आहे. तर, खासदार दुष्यंत कुमार आणि मातोश्री वसुंधरराजे यांना जंगी पार्टी चांगली भारी पडली, असेही म्हटलं जातंय. सध्या सोशल मीडियावर कनिका आणि वसुंधराराजे यांचा फोटो व्हायरल होत आहे. एकूण २ ते ३ पार्ट्या झाल्या असून या पार्ट्यांत वसुंधराराजे आणि कनिका अगदी जवळ आल्या होत्या.
Vasundhara Raje,BJP leader:While in Lucknow,I attended a dinner with my son Dushyant&his in-laws. Kanika, who has unfortunately tested positive for #Covid19 was also a guest. As a matter of abundant caution, my son&I have immediately self-quarantined&we’re taking all precautions. pic.twitter.com/MD3r0XZXu4
— ANI (@ANI) March 20, 2020
तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी संसदेचं अधिवेशन थांबवण्याची मागणी केली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ते दुष्यंत सिंह यांच्या शेजारीच बसले होते. त्यामुळे तेही चिंतेत आहेत.
Delhi: Lok Sabha Speaker Om Birla today inspected the Parliament building, in the wake of #COVID19 outbreak. pic.twitter.com/NwPZJZg2X0
— ANI (@ANI) March 20, 2020
दरम्यान, आपली कोरोना चाचणी 'पॉझिटिव्ह' आल्यानंतर कनिकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली होती. ''गेल्या चार दिवसांपासून मला ताप येत असल्याने मी कोरोनाची टेस्ट केली असून ती पॉझिटिव्ह आली आहे. मी आणि माझे कुटुंब सध्या सगळ्यांपासून पूर्णपणे वेगळे राहात असून डॉक्टरांनी दिलेला सल्ला ऐकत आहोत. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांची देखील तपासणी केली जाईल. दहा दिवसांपूर्वी परदेशातून परतल्यावर विमानतळावर माझे स्कॅनिंग करण्यात आले होते. पण त्यावेळी कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. मी घरी येऊन दहा दिवस झाले असून गेल्या चार दिवसांपासून माझ्या शरीरात कोरोनाची लक्षणं जाणवत आहेत.'', असं तिनं म्हटलंय. परंतु, विमानतळावर तपासणी टाळून तिनं पळ काढल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूनं, अर्थात कोव्हेड 19 या आजारानं भारतातही दहशत निर्माण केली आहे. देशात 218 जणांना कोरोनाची लागण झाली असून या आजाराने चार जणांचा मृत्यूही झाला आहे. हा आजार प्रामुख्यानं परदेशातून आलेल्या व्यक्तींमध्ये दिसून येतोय. अशा परिस्थितीत, लंडनहून आल्यानंतरही घराबाहेर पडणं, पार्ट्यांमध्ये सहभागी होणं हा कनिका कपूरचा बेजबाबदारपणाच असल्याचा संताप नेटिझन्स व्यक्त करत आहेत.