coronavirus: मणिपूरमध्ये गावकऱ्यांनी ‘क्वारंटाइन’साठी बनवले ८० बांबू सेंटर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 06:30 AM2020-05-15T06:30:07+5:302020-05-15T06:30:41+5:30
लॉकडाऊन शिथिल झाल्याने देशाच्या विविध भागांतून स्थलांतरित मजूर, कामगार मोठ्या संख्येने आपापल्या शहरात गावाकडे परतत आहेत. मात्र, त्यांना १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागणार असल्याने त्यांच्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणारी स्वतंत्र व्यवस्था अपुरी पडू शकते
मणिपूर : लॉकडाऊनमुळे विविध राज्यांत अडकून पडलेले मजूर, नागरिक आता आपापल्या राज्यात दाखल होत आहेत. मात्र, बाहेरच्या राज्यांतून आलेल्या नागरिकांना १४ दिवस क्वारंटाइन ठेवण्यात येणार असल्याने त्यांच्यासाठी व्यवस्था असावी, म्हणून येथील गावकऱ्यांनी बांबूच्या साह्याने ८० झोपड्या तयार केल्या आहेत.
लॉकडाऊन शिथिल झाल्याने देशाच्या विविध भागांतून स्थलांतरित मजूर, कामगार मोठ्या संख्येने आपापल्या शहरात गावाकडे परतत आहेत. मात्र, त्यांना १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागणार असल्याने त्यांच्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणारी स्वतंत्र व्यवस्था अपुरी पडू शकते, याचा अंदाज घेऊन येथील नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन बांबूच्या झोपड्या सुरक्षित अंतर ठेवून तयार केल्या आहेत.
बाहेरच्या राज्यातून आलेल्या नागरिकांमधून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी पुरेशी काळजीदेखील घेण्यात येत आहे. त्यासाठी तयार केलेल्या झोपड्यांना ‘क्वारंटाइन सेंटर’ असे नाव दिले आहे. त्यासाठी स्थानिक आरोग्य यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे.
डॉ. जितेंद्र सिंग यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, या सेंटरमध्ये एक बेड, स्वतंत्र प्रसाधनगृह, गॅस टेबल, वीज, पाणी आणि चार्जिंग सॉकेट देण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी क्वारंटाइन होणाºया नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)