coronavirus : लॉकडाऊनमुळे जलप्रदूषण घटलेे, गंगेेचे पाणी स्वच्छ झालेे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 10:32 AM2020-04-05T10:32:28+5:302020-04-05T10:34:23+5:30
गंगेचे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारी आणि इतर स्तरावरून खूप प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र त्याला म्हणावे तसे यश मिळू शकलेले नाही. मात्र...
वाराणसी - देशातील सर्वात मोठी आणि धार्मिकदृष्ट्या पवित्र नदी मानली गेलेली गंगा नदी गेल्या काही दशकात वाढत्या औद्योगिकिकरणामुळे कमालीची प्रदूषित झाली आहे. गंगेचे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारी आणि इतर स्तरावरून खूप प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र त्याला म्हणावे तसे यश मिळू शकलेले नाही. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या नामामी गंगे योजनेमुळेही फारसा फरक पडलेला नाही. मात्र जे सरकारला आणि इतर संस्थांना जमले नाही ते कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनने करून दाखवले आहे.
लॉकडाऊनमुळे देशातील बहुतांश कंपन्या आणि कारखाने बंद आहेत. त्यामुळे देशातील बहुतांश भागातील हवा शुद्ध झाली आहे. तसेच प्रदूषणकारी कारखान्यांमुळे जलप्रदूषणाचा सामना करत असलेल्या गंगेतील पाण्याच्या गुणवत्तेवरही कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा सुपरिणाम झाला आहे. 24 मार्चला करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर गंगेच्या किनाऱ्यावरील अनेक प्रदूषणकारी कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे गंगेतील प्रदूषणाच्या पातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे गंगेच्या स्वच्छतेत 40 ते 50 टक्क्यांनी सुधारणा झाली आहे.
याबाबत प्राध्यापक पी. के. मिश्रा यांनी सांगितले की, गंगेत होणाऱ्या एकूण प्रदूषणामध्ये उद्योगांचा वाटा 10 टक्के आहे. मात्र लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद झाल्याने प्रदूषणात मोठी घट झाली आहे. तसेच 15 आणि 16 मार्च रोजी झालेल्या पावसामुळे गंगेतील पाणी पातळी वाढल्याने तिची सफाई क्षमताही वाढली आहे. 24 मार्चपूर्वीच्या स्थितीशी तुलना केली असता गंगेतील पाण्याच्या गुणवत्तेत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे.