Coronavirus: लाट वेगाने ओसरतेय; ७४ दिवसांत प्रथमच ७० हजारांवर रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 06:34 AM2021-06-15T06:34:57+5:302021-06-15T06:36:02+5:30
देशाचा पॉझिटिव्हिटी दर आला ४.७२ टक्क्यांवर; ६ मे : ४ लाख १४ हजार, १४ जून : ७० हजार ४२१
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ७०,४२१ रुग्ण आढळून आले आहेत, तर ३,९२१ जणांचा मृत्यू झाला. गेल्या ७४ दिवसांत एवढे कमी रुग्ण प्रथमच आढळले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या २,९५,१०,४१० इतकी झाली आहे.
मागील २४ तासांत १,१९,५०१ रुग्ण कोरोनाच्या आजारातून पूर्ण बरे झाले. देशात पूर्ण बरे झालेल्यांची एकूण संख्या २,८१,६२,९४७ इतकी झाली आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, ही समाधानाची बाब आहे. ६ मे रोजी कोरोनाचे सर्वाधिक ४ लाख १४ हजार नवे रुग्ण आढळले होते.
देशात आता एकूण रुग्णांची संख्या दोन कोटी ९५ लाख १० हजार ४१० झाली, दोन महिन्यांनंतर उपचाराधीन रुग्णांची संख्या ९ लाख ७३ हजार १५८ तर एकूण मृत्यूंची संख्या ३,७४,३०५ झाली. उपचाराधीन रुग्णांची संख्या ३.३० टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचा दर ९५.४३ टक्के एवढा झाला आहे. दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांपैकी पॉझिटिव्ह येण्याचा दर ४.७२ टक्के आहे.
दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच शून्य रुग्ण
n कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी धारावी पॅटर्नच बेस्ट असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दुसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झाल्यानंतर गेल्या चार महिन्यांत पहिल्यांदा सोमवारी धारावीत कोणीही बाधित आढळून आले नाही. यापूर्वी सहा वेळा येथे शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.
n सध्या या भागात केवळ १३ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी सहा घरी उपचार घेत आहेत, तर चार रुग्णालयांत आणि तीन रुग्ण काेराेना काळजी केंद्र-२ येथे आहेत.
मुलांवरील कोवॅक्सिनच्या चाचण्यांसाठी निवड सुरू
६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांवर कोवॅक्सिन लसीच्या चाचण्यांसाठी मुलांची निवड प्रक्रिया दिल्लीतील एम्स रुग्णालय मंगळवारपासून सुरू करणार आहे. या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर २ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचण्या करण्यात येतील.