coronavirus: आपण मायदेशी जात आहोत! पायलटच्या घोषणेने प्रवासी आनंदित; वंदे भारत मोहिमेतील क्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 01:15 AM2020-05-11T01:15:22+5:302020-05-11T01:17:53+5:30
दुसऱ्या देशांत इतक्या मोठ्या संख्येने अडकलेल्या नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी आखलेली ही अशा प्रकारच्या जगातील सर्वांत मोठ्या मोहिमांपैकी एक आहे.
नवी दिल्ली : आता आपण मायदेशी चाललो आहोत, असे पायलटने जाहीर करताच विमानांतील प्रवाशांना विलक्षण आनंद झाला. अबुधाबी व दुबई येथे अडकलेल्या भारतीयांपैकी ३५४ जणांना गुरुवारी भारतात घेऊन आलेल्या विमानांतील हे दृश्य होेते. जगातील १२ देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी १४,८०० जणांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने आखलेल्या ‘वंदे भारत’ मोहिमेला प्रारंभ झाला आहे.
दुसऱ्या देशांत इतक्या मोठ्या संख्येने अडकलेल्या नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी आखलेली ही अशा प्रकारच्या जगातील सर्वांत मोठ्या मोहिमांपैकी एक आहे. अबुधाबी व दुबई येथून भारतीयांना घेऊन निघालेली एअर इंडिया एक्स्प्रेसची दोन विमाने अनुक्रमे कोची व कोडिकोळ येथे गुरुवारी पोहोचली. आपण आता मायदेशी चाललो आहोत, हा एका विमानातील पायलट कॅप्टन अन्सूल शेओरान यांनी उड्डाण करण्याच्या आधी दिलेला संदेश व त्यावेळी प्रवाशांना झालेला आनंद याचा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये झळकला आहे.