CoronaVirus News: खासदारांनो, तुम्ही मास्क काढा, अन्यथा...; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 10:56 AM2020-05-12T10:56:00+5:302020-05-12T10:57:32+5:30
राज्यसभेत फेस मास्क घातलेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांना पाहून उपराष्ट्रपती संतापले
नवी दिल्ली: कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं आवाहन केलं जात आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वारंवार मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. प्रशासनाकडून याबद्दल जनजागृती सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र देशात लॉकडाऊन सुरू होण्याच्या केवळ एक आठवडा आधी मास्क वापरणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांवर उपराष्ट्रपती भडकले होते. तुम्ही मास्क काढून या. अन्यथा, मी काय करेन हे तुम्हाला माहित्येय, या शब्दांमध्ये नायडूंनी विरोधी खासदारांना कारवाईचा इशारा दिला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २४ मे रोजी देशाला संबोधित केलं. मोदींनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर २५ मेपासून देशात लॉकडाऊन सुरू झाला. गेल्या दीड महिन्यापासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र मोदींच्या घोषणेच्या आठवड्याभर आधी विरोधी पक्षाचे खासदार राज्यसभेत मास्क घालून आले होते. त्यावेळी सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी त्यांना बाहेर जा आणि मास्क काढून या, अशी सूचना केली. १८ मार्च रोजी हा प्रकार घडला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
March 2020, opposition MPs in Rajya Sabha were wearing masks to prevent Covid19 and the Chairperson, Vice President @MVenkaiahNaidu asked them to remove it, saying it's not allowed & threatened of an action.
— Gaurav Pandhi (@GauravPandhi) May 11, 2020
Just imagine! This was Govt's stand 6 days before lockdown. No masks!🤦♂️ pic.twitter.com/dKltM3n63w
गेल्या दीड महिन्यांपासून सर्वच जण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करत आहेत. मात्र त्याच्या केवळ आठवडाभर आधी मास्क वापरणाऱ्या खासदारांना नायडूंनी कारवाईचा इशारा दिला होता. 'सदनात मास्क घालण्यास परवानगी नाही. तुम्ही सगळे वरिष्ठ सदस्य आहात. सदनाचं कामकाज साधण्यासाठी आवश्यक असणारे नियम तुम्हाला माहीत आहेत. तुम्ही मास्क काढा. अन्यथा मी काय करेन याची तुम्हाला कल्पना आहे,' असं नायडू म्हणाले होते.
'मी तुम्हाला मास्क काढण्याचं आवाहन केलं आहे. मास्क घातलेल्या सदस्यांनी जावं आणि मास्क काढून यावेत. खासदारांनी मास्क न काढल्यास सभागृहाचे कामकाज चालवणं कठीण होईल. यानंतर लोक इतरही गोष्टी सुरू करतील,' असं नायडूंनी म्हटलं होतं. यावेळी सभागृहात काहीसा गदारोळदेखील झाला होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एक छदामसुद्धा देणार नाही; ८० लाख निकृष्ट मास्क पाठवणाऱ्या चीनविरोधात 'या' पंतप्रधानांचा आक्रमक पवित्रा
देशातील लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता; पण आता बरंच काही बदलणार?
आता परिवहन मंत्री अनिल परब यांना सरकार अटक करणार का?; भाजपाचा सवाल
लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्रा
चिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप