कोरोनाचा वेग वाढतोय! देशात 79 टक्क्यांनी वाढला संसर्ग, 'या' राज्यांमध्ये धोक्याची घंटा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 09:30 AM2023-04-11T09:30:36+5:302023-04-11T09:30:58+5:30
गेल्या आठवड्यात म्हणजेच रविवारपर्यंत देशात 36 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
नवी दिल्ली : देशात मागील काही दिवसांपासून कोरोना व्हायरस पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. शहर, उपनगरातील दैनंदिन कोरोना रुग्णांसह सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज 5 हजारांहून अधिक नवीन कोरोना प्रकरणांची नोंद होत आहे. तसेच, देशात पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा वाढला आहे. गेल्या आठवड्यात म्हणजेच रविवारपर्यंत देशात 36 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोना प्रकरणांमध्ये 79 टक्क्यांनी वाढ झाली आहे, जी जवळपास सात महिन्यांतील सर्वाधिक आहे. कारण गेल्या आठवड्यापर्यंत ज्या राज्यांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी रुग्ण होते, त्या राज्यांमध्येही आता रुग्णांची संख्या वाढत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 3 एप्रिल ते 9 एप्रिलपर्यंत भारतात कोरोनामुळे 68 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याआधीच्या आठवड्यात 41 जणांचा मृत्यू झाला होता. तर केरळमध्ये सर्वाधिक 11,296 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, जी मागील आठवड्यापेक्षा 2.4 पट जास्त आहे. यानंतर महाराष्ट्रात 4,587, दिल्लीत 3,896, हरियाणामध्ये 2,140 आणि गुजरातमध्ये 2,039 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.
चिंताजनक बाब म्हणजे, ज्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आत्तापर्यंत प्रकरणे तुलनेने कमी होती, तेथे ही संख्या झपाट्याने वाढली. यामध्ये राजस्थान, जिथे आठवड्याच्या अखेरीस कोरोनाचे 631 रुग्ण आढळले. तर यापूर्वी 194 प्रकरणे होती. दुसरीकडे, छत्तीसगडमध्ये 113 ते 462, ओडिशात 193 ते 597 आणि जम्मू-काश्मीरमध्ये 129 ते 413, इतर राज्यांचाही समावेश आहे. भारतात 3 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान कोरोनाची 36,250 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, तर मागील आठवड्यात 20,293 प्रकरणे होती. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांचा हा सलग आठवा आठवडा होता.
राजस्थानमध्ये सोमवारी कोरोना व्हायरसची लागण झालेल्या आणखी तीन जणांचा मृत्यू झाला असून संसर्गाची 197 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गाचे 328 नवीन रुग्ण आढळून आले. या संख्येत आदल्या दिवसाच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक घट झाली असून त्यामुळे राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 81,50,257 वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.
मुंबईत सहा हजारांहून अधिक जण गृहविलगीकरणात
शहर, उपनगरातील दैनंदिन कोरोना रुग्णांसह सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या शहर, उपनगरात 6 हजार 988 नागरिक गृहविलगीकरणात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. याखेरीज, शहरातील 1 हजार 367 सक्रिय रुग्णांपैकी 92 टक्के रुग्ण लक्षणविरहित असल्याचे निरीक्षण आहे. सध्या मुंबईतील पाच कोरोना रुग्णांची स्थिती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईत 1 हजार 148 रुग्ण लक्षणविरहित आहेत, तर केवळ 91 रुग्णांमध्ये सौम्य, तीव्र आणि मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. तसेच, शहर, उपनगरात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या 6.16 टक्के आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.