CoronaVirus: देश दुसऱ्या लॉकडाऊनच्या दिशेने? कोणत्या राज्यात काय आहेत निर्बंध?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 04:39 AM2021-04-18T04:39:58+5:302021-04-18T04:40:11+5:30
CoronaVirus restrictions: देशातील सर्वाधिक रुग्णवाढीत नाशिक, नागपूर, पुणे, मुंबईचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महाराष्ट्रात १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. १ मेपर्यंत राज्यात संचारबंदी असणार आहे. अनिवार्य सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. दिल्लीत शुक्रवारी रात्रीपासून ५६ तासांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारी सकाळपर्यंत हे निर्बंध असणार आहेत. आपत्कालीन सेवा वगळता सर्व सेवा या काळात बंद राहणार आहेत. राजस्थानात शुक्रवारी सहा वाजेपासून सोमवारी सकाळी पाचपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. अनिवार्य सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत.
चंदीगडमध्ये वीकेंड लॉकडाऊन लागू केले आहे. शुक्रवारी रात्री १० पासून सोमवारी सकाळी पाचपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. अनिवार्य सेवांना यातून सूट आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, मॉल हे ५० टक्के लोकांसह चालू राहतील. उत्तर प्रदेश सरकारने रविवारी लॉकडाऊन जाहीर केले आहे. मास्क न वापरणाऱ्यांना १००० रुपये दंड आकारला जाणार आहे. फक्त आवश्यक सेवा सुरू असतील.
n देशातील चार शहरांत नव्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. दर दहा लाख लोकांमागे नवे रुग्ण वाढत असलेल्या शहरांत नागपूर, पुणे, मुंबई व नाशिक या शहरांचा समावेश आहे.
n गत एक महिन्यातील आकडेवारीवरून हे दिसून आले आहे. तर, टॉप टेनमध्ये दिल्ली, लखनौ, बंगळुरू, भोपाळ, इंदूर, पाटणा यांचा समावेश आहे. १६ मार्च ते १५ एप्रिल या काळात मुंबईत ३.७ लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत.
मुंबईत गेल्या महिन्यात ३.७० लाख रुग्ण
n देशातील ज्या शहरात गत महिन्यात रुग्णवाढ मोठ्या प्रमाणात झाली त्यात नाशिक, नागपूर, पुणे, मुंबई, लखनौ, दिल्ली यांचा समावेश आहे.
n नाशिकमध्ये गत महिन्यात ९७,७६५, नागपूरमध्ये १,३४,८४०, पुण्यात २,४७,५२९, मुंबई ३,७०,८९६, लखनौ ४५,१२८, दिल्ली १,४०,०७३ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
असे आहेत निर्बंध
n कर्नाटकात राज्य सरकारने सात जिल्ह्यांतील रात्रीची संचारबंदी २० एप्रिलपर्यंत लागू केली. बंगळुरु, मंगळुरु, कालाबुरागी, बीदर, तुमकुरु, उडुपी- मणिपाल येथे हे निर्बंधा लागू असतील.
n पंजाब सरकारने राज्यात ३० एप्रिलपर्यंत रात्री ९ ते सकाळी ५ या काळात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
n उत्तराखंडमध्ये रात्री १०.३० ते सकाळी ५ पर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. बसपासून ते सार्वजनिक वाहनात बसण्याची क्षमता ५० टक्के घटविली आहे. हरयाणात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
n ओडिशाच्या दहा जिल्ह्यांत वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. हे सर्व जिल्हे
छत्तीसगडच्या बॉर्डरवरील आहेत. तर सर्व शहरी भागात १७ एप्रिलपासून रात्रीची संचारबंदी असेल. केरळमध्येही कोणत्याही
समारंभासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे.
n छत्तीसगडच्या अनेक जिल्ह्यांत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तर जम्मू - काश्मिरातील जम्मू, उधमपूर, कठुआ, श्रीनगर, बारामुला, बडगाम, अनंतनाग, कुपवाडासह आठ जिल्ह्यांत रात्रीची संचारबंदी असणाार आहे.