coronavirus: कोरोनावरील लस कधी येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान
By बाळकृष्ण परब | Published: November 24, 2020 02:51 PM2020-11-24T14:51:22+5:302020-11-24T14:59:07+5:30
Corona vaccine Update News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तेथील कोरोनाची परिस्थिती आणि पुढील रणनीती जाणून घेतली.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांत देशातील विविध राज्यांमधील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ दिसून आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाल आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तेथील कोरोनाची परिस्थिती आणि पुढील रणनीती जाणून घेतली. यावेळी उपस्थित असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाविरोधातील रणनीती आणि लसीकरणाबाबतची आपली भूमिका मांडली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोनावरील लसीबाबत मोठे विधान केले आहे.
आजच्या बैठकीला उपस्थित मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावरील लसीबाबत हे विधान केले. मोदी म्हणाले की, कोरोनावरील लस कधीपर्यंत येईल हे याची वेळ आम्ही निश्चित करू शकत नाही. तर ही बाब पूर्णपणे शास्त्रज्ञांच्या हातात आहे. काही लोक याबाबत राजकारण करत आहेत. मात्र अशा लोकांना राजकारण करण्यापासून रोखता येणार नाही.
कोरनामधून बऱ्या होणाऱ्या आणि मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींचा विचार केल्यास जगातील इतर देशांच्या तुलनेत भारत चांगल्या स्थितीत आहे. याचं श्रेय सर्वांनी एकत्र मिळून केलेल्या प्रयत्नांना जातं, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत बोलताना केलं.
As a result of joint efforts, today India is in a better situation than other countries when it comes to recovery and fatality rates: Prime Minister Narendra Modi in virtual meeting with CMs#COVID19https://t.co/yge0tM54SGpic.twitter.com/eiOQcf143A
— ANI (@ANI) November 24, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि पुढील उपाययोजनांबाबत पंतप्रधानांना माहिती दिली. कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत. महाराष्ट्रात लसीकरण कशा रितीने करावे, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
Earlier visuals of Prime Minister Narendra Modi's virtual meeting with Chief Ministers over the #COVID19 situation; Home Minister Amit Shah also participated. pic.twitter.com/Lbb6gDXqD2
— ANI (@ANI) November 24, 2020
दरम्यान, कोरोनाचा संभाव्य उद्रेक लक्षात घेता राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्याहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी (फळढउफ टेस्ट रिपोर्ट) अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य असेल. अहवाल निगेटिव्ह असेल त्यांनाच प्रवेश मिळेल, तर पॉझिटिव्ह असलेल्यांना कोविड सेंटरमध्ये राहावे लागेल. रिपोर्ट नसेलेल्यांची टेस्ट केली जाईल. रेल्वे, विमान आणि रस्ते वाहतूक अशा तिन्ही मार्गावरील प्रवाशांना हे निर्बंध लागू असणार आहे.
चार राज्यातून ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांनाही कोरोना रिपोर्ट सादर करावा लागेल. त्यांना प्रवासाच्या ९६ तास आधी ही चाचणी करावी लागेल. तर रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांची बॉर्डरवरच्या चेकपोस्टवर तपासणी केली जाईल. ज्या लक्षणे असलेल्यांची अँटीजेन चाचणी केली जाईल. प्रवासी पॉझिटिव्ह आढळला तर कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे लागेल. उपचार खर्च त्यालाच करावा लागणार आहे.
विमान प्रवाशांसाठी नियमावली
विमानतळावर उतरल्यानंतर कोरोना चाचणी अहवाल दाखवणे बंधनकारक आहे. ही चाचणी प्रवास सुरू करण्याच्या ७२ तासांत केलेली असावी. तपासणी न केलेल्यांना विमानतळावर स्वखर्चाने तपासणी करून घ्यावी लागेल. त्यासाठी तिथे तपासणी केंद्रे असेल. तपासणीनंतरच प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी असेल. मात्र प्रवाशांना फोन क्रमांक, घराचा पत्ता द्यावा लागेल. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास ट्रेसिंग करण्यासाठी म्हणून हा तपशील प्रवाशांकडून टेस्टिंगवेळी घेण्यात येईल.