Coronavirus : WHO प्रमुखांनी ट्विटरवर लिहिलं 'लव्ह'; लोकांनी विचारलं फक्त शींबरोबरच?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 02:07 PM2020-04-16T14:07:42+5:302020-04-16T14:15:34+5:30
डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अदानोम गेब्रेयसस यांनी याबद्दल लव्ह शब्द टाकून अमेरिकेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
नवी दिल्ली: कोरोना विषाणूमुळे जगभरात हाहाकार माजला असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरल्याचे कारण देत जागतिक आरोग्य संघटनेला दिलेला निधी रोखला आहे. इतकेच नाही तर डब्ल्यूएचओ चीनचे समर्थन करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अदानोम गेब्रेयसस यांनी याबद्दल लव्ह शब्द टाकून अमेरिकेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
अशा वातावरणात डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी बुधवारी रात्री एका शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या, ‘लव्ह’ शब्दाद्वारे ट्विटरच्या माध्यमातून भावनांना वाट मोकळी करून दिली. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक असलेल्या टेड्रोस अदानोम गेब्रेयसस यांचं लव्ह लिहिलेलं ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं असून, त्यावर चित्रविचित्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
कदाचित ते अमेरिकेच्या नाराजीला प्रेमाच्या संदेशाद्वारे दूर करू इच्छित असतील. परंतु सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांनाच ट्रोल केलं आहे. लोकांनी त्यांना पक्षपाती असल्याचं सांगितलं आहे. भारताच्या एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले आहे की, 'शींना माहीत आहे की, डब्ल्यूएचओ आपल्या प्रेमात आहे'.
प्रणव महाजन यांनी लिहिले, 'सर्वांवर प्रेम करा. सर्व मानव, सर्व प्राणी आणि सर्व देशांमधील नागरिकांवर प्रेम करा, फक्त एकाच देशाला महत्त्व देऊ नका.
टेड्रोस यांच्या ट्विटनंतर लोकांनी त्यांना इतके ट्रोल करण्यास सुरुवात केली की, ट्विटरवर जागतिक आरोग्य संघटनेऐवजी 'वुहान हेल्थ ऑर्गनायझेशन' ट्रेंडिंग सुरू झालं. काही वापरकर्त्यांनी शी आणि टेड्रोस मिठी मारत असल्याचेही मीम्स व्हायरल केले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावात काळात चीनच्या प्रेमात आपण मानवता विसरल्याचीही टीकासुद्धा काही युजर्सनी केली आहे.Love.
— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) April 15, 2020
"जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात निधी पुरविला जातो. ज्यावेळी प्रवासावर निर्बंध घातले होते, त्यावेळी त्यांनी माझ्यावर टीका आणि त्याबद्दल असहमती दर्शविली होती. बऱ्याच गोष्टींबद्दल ते चुकीचे होते. ते जास्तकरुन चीनला केंद्रित करत असल्याचे दिसून येते. आमच्याकडून जागतिक आरोग्य संघटनेवर खर्च होणाऱ्या निधीवर नियंत्रण आणत आहोत" असं डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यानंतर आता त्यानंतर ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.