Coronavirus: कोरोनाची चौथी लाट सौम्य असेल की तीव्र? देशात कशी असेल परिस्थिती, तज्ज्ञांनी केला असा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 12:32 PM2022-03-30T12:32:37+5:302022-03-30T12:36:06+5:30
Coronavirus in India: गेल्या काही दिवसांमध्ये जगातील अनेक देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तर भारतात कोरोनाचा संसर्ग नाममात्र शिल्लक राहिला आहे. मात्र आता जगातील इतर भागांप्रमाणेच भारतातही कोरोनाची चौथी लाट येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांमध्ये जगातील अनेक देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तर भारतात कोरोनाचा संसर्ग नाममात्र शिल्लक राहिला आहे. मात्र आता जगातील इतर भागांप्रमाणेच भारतातही कोरोनाची चौथी लाट येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कानपूर आयआयटीचे प्राध्यापक मणिंद्र अग्रवाल यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी सर्व शक्यतांना पूर्णविराम देताना आपल्या गणितीय मॉडेलच्या सूत्रानुसार सांगितले की, भारतात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा प्रभाव दिसणार नाही. जर कोरोनाची चौथी लाट आलीच तर ती तिसऱ्या लाटेप्रमाणे कमकुवत असेल. प्राध्यापण मणिंद्र अग्रवाल यांनी आतापर्यंत कोरोनाबाबत जे दावे केले आहेत, ते अगदी अचूक सिद्ध झाले आहेत.
प्राध्यापक मणिंद्र अग्रवाल यांनी केलेल्या दाव्यानुसार देशातील ९० टक्के लोकसंख्येमध्ये नॅचरल इम्युनिटी विकसित झाली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची चौथी लाट आलीच तकी बाधितांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासणार नाही. तसेच ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी असेल. प्राध्यापक अग्रवाल यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार चौथी लाट येण्याची शक्यता नाही आहे. मात्र विषाणुच्या म्युटेंटमध्ये काही बदल झाला तर परिस्थिती बदलू शकते.
प्राध्यापक अग्रवाल यांनी आपल्या गणितीय मॉडेलच्या सूत्रानुसार कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला होता. त्यांनी सांगितले की, तिसऱ्या लाटेदरम्यान, ओमायक्रॉन वेगाने पसरत होता. या म्युटेंटने व्हॅक्सिनपासून निर्माण झालेल्या इम्युनिटीलाही बायपास केले होते. मात्र नॅचरल इम्युनिटीला बायपास करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे भारतामध्ये ओमायक्रॉनमुळे केवळ ११.८ टक्के लोकांनाच संसर्ग झाला होता. तर ग्रीसमध्ये सर्वाधिक ६५.१ टक्के लोकांना संसर्ग झाला होता. ज्या देशांमध्ये नॅचरल इम्युनिटी अधिक विकसित झाली होती. तेथील लोकांना कमी प्रमाणात संसर्ग झाला होता. दरम्यान, चीन दक्षिण कोरियासह युरोपमधील अनेक शहरांमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेचा प्रकोप दिसून येत आहे. चीनमधील शांघाईमध्ये तर लॉकडाऊन लावावे लागले आहे.