CoronaVirus लॉकडाउन संपणार की वाढणार? आज ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 06:41 AM2020-04-11T06:41:44+5:302020-04-11T06:42:34+5:30
पंतप्रधान आज करणार सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या रोखण्यासाठी काय करता येईल याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, शनिवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतील असे समजते. मात्र हा निर्णय रविवारी जाहीर केला जाऊ शकेल. देशाला उद्देशून भाषण करून ते लॉकडाउन वाढविण्याची गरज का आहे, हे सांगतील, असा अंदाज आहे.
पंतप्रधान या व्हिडीओ कॉन्फरन्सनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणेही ऐकून घेतील. त्यानंतर मोदी आपल्या वरिष्ठ सहकारी मंत्र्यांशीही चर्चा करणार आहेत.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र, तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार चिंतेत आहे. ही सामुदायिक संसर्गाची शक्यता असू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. अशा स्थितीत लॉकडाऊन वाढवून जिथे अधिक रुग्ण आढळत आहेत, तिथे लोकांना अजिबात घराबाहेर पडू न देणे हाच मार्ग सरकारला दिसत आहे. त्याची राज्यांनी अधिक कडक अंमलबजावणी करावी, असा केंद्र सरकारचा आग्रह आहे.