CoronaVirus लॉकडाऊनमध्ये EPF खात्यातून तत्काळ पैसे काढा; या आहेत अटी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 05:39 PM2020-03-29T17:39:20+5:302020-03-29T17:40:04+5:30
कोरोनाशी लढताना किंवा घरात राहिल्याने पैशांची गरज लागणार आहे. यासाठी ईपीएफओ धावून आले आहे.
कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करावा लागल्याने अनेकांचा रोजगार बुडालेला आहे. पंतप्रधानांनी कंपन्यांना कर्मचाऱ्यांचा पगार करावा असे आवाहन केले आहे. मात्र, याचबरोबर करोडो नोकरदारांना मोठा दिलासाही दिला आहे. नोकरदारांच्या पीएफ खात्यामध्ये कंपनी आणि कर्मचाऱ्यांचा पगारातील हप्ता असा २४ टक्के पीएफ जमा करण्यात येणार आहे. याचबरोबर आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली होती.
कोरोनाशी लढताना किंवा घरात राहिल्याने पैशांची गरज लागणार आहे. यासाठी ईपीएफओ धावून आले आहे. कामगार मंत्रालयाने दिलेल्या आदेशांनुसार कोणताही कर्मचारी त्याच्या पीएफ खात्यातून ७५ टक्के रक्कम विनापरतावा काढू शकणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याची घोषणा केली होती.
ईपीएफओने नुकतेच पैसे काढण्याच्या अटींमध्ये मोठे बदल केले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे हे बदल बाजुला करत सर्वांसाठी पीएफ काढण्याचा पर्याय ठेवला आहे. याद्वारे एकूण जमा रकमेच्या ७५ टक्के किंवा तीन महिन्यांचा पगार यापैकी जेवढी रक्कम कमी असेल ती काढता येणार आहे.
कामगार मंत्रालयाने २८ मार्चला याबाबतची सूचना जारी केली आहे. यानुसार तीन महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता किंवा ईपीएफ खात्यामध्ये जमा असलेल्या एकूण रकमेपेक्षा ७५टक्के रक्कम यापैकी जी रक्कम कमी भरेल ती काढण्याची परवानगी दिली आहे. महत्वाचेम्हणजे ही रक्कम पुन्हा परत करण्याची आवश्यकता नाही.
केंद्र सरकारने कोरोनाला महामारी घोषित केले आहे. यामुळे देशभरातील कारखाने, कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी ही रक्कम काढू शकणार आहेत. यासाठी कोणालाही अडविले जाणार नाही. यासाठी ईपीएफ योजना, 1952 चा अनुच्छेद 68 एल (3) जोडण्यात आला आहे. यानुसार हा आदेश कर्मचारी भविष्य निधी कोष २८ मार्चपासून लागू झाला आहे.
अधिसूचना काढल्यानंतर ईपीएफओने त्यांच्या देशभरातील कार्यालयांना आदेश देत कोणत्याही कर्मचाऱ्याने ही रक्कम काढण्यासाठी अर्ज केला तर त्यावर तात्काळ कार्यवाही करावी. कारण संकटाच्या काळात त्यांना मदत मिळू शकेल, अशा सूचना दिल्या आहेत.