Coronavirus: ‘आम्ही लांब उभे राहू; पण आम्हाला जेवू द्या’मजुरांची वणवण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 04:27 AM2020-03-29T04:27:17+5:302020-03-29T06:14:32+5:30
लॉकडाऊनची लंगर-संस्कृती; पदरमोड करून गरीब लोकांना करत आहेत मदत
नवी दिल्ली : हातावर पोट असणाऱ्यांची काळजी दिल्लीकरच घेत आहेत. वेस्ट पटेलनगरमधील ब्लॉक २०. बंद दुकानाच्या ओट्यावर मोठी लोखंडी कढई, त्यात तेल व गरमागरम ब्रेड पकोडे. शेजारी चहाचा थर्मास भरून ठेवलेला. रात्रभर काहीही न खाल्लेले, पहाटेच घराबाहेर पडलेले स्वच्छता कर्मचारी- अशांच्या पोटापाण्याची सोय या लंगरमुळे झाली. पोलिसांचा सायरन वाजत होता. पोलीस पोहोचले. गर्दी करू नका म्हणून त्यांनी हटकले. काही जण म्हणाले, काल रात्रीपासून काहीच खाल्ले नाही साहेब. पोलीसही काहीसे ओशाळले. एक मजूर म्हणाला, आम्ही लांब उभे राहतोय एकमेकांपासून. पण आम्हाला खाऊ द्या.
लॉकडाऊनमधील हे चित्र पंजाबीबहुल भागात दिसते आहे. मेट्रो स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गल्लीबोळात, खुल्या मैदानात सायकल रिक्षातच राहणारे, तेथेच झोपणारे . सवारी नाही म्हणून पैसे नाहीत, पैसे नाहीत म्हणून अन्न नाही. जगण्याचे प्रश्न गहन होतात. अशा वेळी पटेलनगरमधील किशन गोयल, हिमांश यांच्यासारखी माणसे पुढे येतात. पदरमोड करून, स्वत:च्या दुकानाच्या ओट्यावरच भटक्यांच्या खानपानाची व्यवस्था करतात. माणूसपण सरत नाही अशांचे. २-३ ब्रेड पक ोडे, तीन चार कप चहा रिचवून एक मजूर तृप्ततेने म्हणतो, चलो आज का दिन निकल गया!
गुरुद्वाराच्या लंगरमध्ये सारे भेद विसरून लोक प्रसाद ग्रहण करतात. ईश्वरी शक्तीची उपासना करतात. आता तर गुरुद्वाराही बंद आहे. मंदिराला टाळे लागले. मशिदी ओस पडल्या. चर्चच्या गेटवर भले मोठे कुलूप. मग जायचे तरी कुठे़ लॉकडाऊनमुळे अन्नपाण्यासाठी मजुरांची वणवण सुरू आहे. त्यांच्यासाठी किशन गोयल, हिमांश यांनी एक दिवसआड खानपानाची व्यवस्था केली. किमान चहा-नाश्ता तरी द्यायलाच हवा. गोयल रेल्वे कंत्राटदार.
अशा वेळी आपण नाही पुढे यायचे तर कधी, असा प्रश्न विचारून ते म्हणतात, सधन माणसे काहीतरी व्यवस्था करतीलच. सायकल रिक्षावाले, मजूर, गोरगरिबांनी जायचे कुठे. त्यांच्यासाठी करतोय आम्ही. काही मदत हवी का? या प्रश्नावर म्हणतात, नको. शिधा आहे आमच्याकडे. पण कधी काही आपत्कालीन स्थिती उद्भवली तर मदत करा. पत्रकार म्हणून तुमची मदत घेऊ आम्ही.