CoronaVirus: कोरोनाच्या लढ्यात भारताला World Bankचा आधार; कोट्यवधींचा निधी देण्याचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 01:07 PM2020-04-01T13:07:34+5:302020-04-01T13:13:01+5:30
चार वर्षांत परियोजनेंतर्गत महारोगराईच्या काळात भारतीय आरोग्य प्रणाली आणखी विकसित आणि अद्ययावत करण्याचा जागतिक बँकेचा मानस आहे.
नवी दिल्लीः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, मोदींनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच कोरोनापासून बचावासाठी लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहनही करण्यात येत आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असल्यानं मोदींनी पीएम केअर्स फंडाची स्थापना केली, त्या फंडाद्वारे अनेक मदतीचे हात पुढे आले आहेत. भारतीय आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करण्यासाठी आता जागतिक बँक सहाय्य करणार आहे. जागतिक बँकेनं भारत सरकारला चार वर्षीय आरोग्य योजनेंतर्गत १ बिलियन डॉलर म्हणजे ७ हजार कोटी देण्याचा प्रस्ताव दिला आहे. चार वर्षांत परियोजनेंतर्गत महारोगराईच्या काळात भारतीय आरोग्य प्रणाली आणखी विकसित आणि अद्ययावत करण्याचा जागतिक बँकेचा मानस आहे.
परियोजनेनुसार, भारताची स्वास्थ्य प्रणाली योग्य पद्धतीनं चालवण्यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. जागतिक बँकेनं देऊ केलेल्या निधीमुळे देशाला कोरोनाच्या धोक्यापासून रोखण्यासही मदत मिळणार आहे. मोदी सरकारला ही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जाण्याची भीती सतावते आहे. त्यामुळे यासाठी एका दीर्घकालीन रणनीतीवर काम करण्याची आवश्यकता आहे. त्याच पार्श्वभूमीवर जागतिक बँकेनं हा मदतीचा हात पुढे केला आहे.
भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या १४४०वर पोहोचली असून, हा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामध्ये २४ तासांत तब्बल २२७ रुग्ण आढळले आहेत. देशात १०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवाडीनुसार आतापर्यंत देशात कोरोनामुळे ३८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.