coronavirus : चिंताजनक! देशात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये या वयोगटातील रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 04:44 PM2020-04-18T16:44:20+5:302020-04-18T17:02:23+5:30
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या वयोगटाबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धक्कादायक माहिती आज जाहीर केली आहे.
नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा देशातील संक्रमणाचा वेग गेल्या दोन-तीन दिवसांपासून काहीसा मंदावला आहे. आज आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 991 नवे रुग्ण सापडले असून, 43 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या वयोगटाबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धक्कादायक माहिती आज जाहीर केली आहे.
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण आणि त्यांचा वयोगट पाहिल्यास देशात साठ वर्षांवरील रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. देशभरात कोरोनामुळे आतापर्यंत 430 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या वयोगटाचा विचार केल्यास 0 ते 45 या वयोगटातील मृतांचे प्रमाण 14 टक्के आहे. तर 45 ते 60 या वयोगटातील मृतांचे प्रमाण 10.30 टक्के आहे. तर साठ वर्षांवरील रुग्णांचे प्रमाण तब्बल 75 टक्के आहे. मृतांमध्ये 60 ते 75 या वयोगतील 33 टक्के आणि 75 वर्षांवरील 42 टक्के व्यक्तींचा समावेश आहे.
दरम्यान, देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींचा आकडा 14 हजार 378 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 1992 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत 480 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आधी कोरोनाचे रुग्ण सापडलेल्या 45 जिल्ह्यात गेल्या 22 दिवसांपासून एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही.