Coronavirus :यंदा प्रथमच रमजानच्या प्रार्थना व नमाज घरातच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 03:45 AM2020-04-26T03:45:16+5:302020-04-26T03:45:28+5:30
‘लॉकडाऊन’चे कसोशीने पालन करण्याचे आवाहन केल्याने रमजानच्या प्रार्थना व नमाज मशिदींमध्ये न जाता प्रथमच घरांमध्येच केल्या जात आहेत.
नवी दिल्ली : ‘इमरत-ए- शरिया-हिंद’च्या ‘रुयात-ए-हिलाल कमिटी’ने दिल्लीसह देशाच्या अनेक भागांत चंद्रदर्शन झाल्याचे जाहीर केल्याने मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यास व त्यातील रोजांना शनिवारपासून सुरुवात झाली. मुस्लिमांच्या सर्वच धर्मगुरुंनी व धार्मिक तसेच सामाजिक संस्थांनी ‘लॉकडाऊन’चे कसोशीने पालन करण्याचे आवाहन केल्याने रमजानच्या प्रार्थना व नमाज मशिदींमध्ये न जाता प्रथमच घरांमध्येच केल्या जात आहेत.
एरवी चंद्र दिसल्याचे जाहीर झाले की, रमजानच्या खास ‘तरावीह’ प्रार्थनेसाठी मुस्लिमांची मशिदींमध्ये झुंबड उडते. परंतु यंदा तसे दिसले नाही. मुस्लिम बांधवांनी घरातच प्रार्थना केली व नेहमीप्रमाणे प्रेमालिंगन देणे शक्य नसल्याने आप्तेष्टांना फोनवरून शुभेच्छा दिल्या.
रोझा सोडण्यासाठी होणाऱ्या इफ्तारच्या मेजवान्यांनी गजबजून जाणाºया मुस्लिमांच्या वस्त्या व तेथील रस्ते सुनेसुने होते.
रमझानचे नमाज व इफ्तार हे मुस्लिमांचे खरे तर सामुदायिकपणे साजरे केले जाणारे रिवाज. पण इतर सर्वच भारतीयांप्रमाणे मुस्लिम बांधवांनीही कोरोनाविरुद्धचा लढा जिंकण्याचा निर्धार केल्याने धर्माला व मनाला मुरड घालून त्यांनी घरात बसूनच परवरदिगार अल्लाची मनोभावे करुणा भाकली. खास करून या कोरोनावर मात करण्याची शक्ती द्यावी हा प्रार्थनांचा विशेष रोख असेल.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी वड्रा यांच्यासह अनेकांनी रमझानच्या शुभेच्छा दिल्या व या पवित्र महिन्यांत मुस्लिमांना कोरोनाशी लढण्याची शक्ती मिळो, अशा कामना केली.