CoronaVirus News: मजूर चोर, दरोडेखोरांसारखे पळताहेत; भाजपाच्या राज्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 12:34 PM2020-05-17T12:34:00+5:302020-05-17T12:37:33+5:30
CoronaVirus News: राज्यमंत्र्यांच्या विधानाचा विरोधकांकडून समाचार; काँग्रेस, सपाची टीका
लखनऊ: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. उद्योगधंदे ठप्प असल्याचा सर्वाधिक फटका कामगार आणि मजूर वर्गाला बसला आहे. लॉकडाऊन वाढतच चालल्यानं हातावर पोट असलेले लाखो मजूर आपल्या राज्यांच्या दिशेनं चालू लागले आहेत. शेकडो अंतर पायी तुडवत निघालेल्या मजुरांचे हृदयद्रावक फोटो, त्यांच्या व्यथा समोर येत आहेत. ते पाहून अनेक जण हळहळले. मात्र भाजपाच्या एका नेत्यानं या मजुरांची तुलना चोर आणि दरोडेखोरांशी केली आहे. त्यावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
उत्तर प्रदेशातले भाजपाचे नेते आणि राज्यमंत्री चौधरी उदयभान सिंह यांनी गावी परतण्यासाठी पायपीट करणाऱ्या मजुरांबद्दल अतिशय वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी मजुरांची तुलना थेट चोर आणि दरोडेखोरांशी केली. या स्थलांतरित मजुरांसाठी सरकार खाण्यापिण्याची व्यवस्था करतंय. मात्र तरीही ते शेतांमधून चोर, दरोडेखोरांसारखे जात आहेत, असं सिंह म्हणाले. सिंह उत्तर प्रदेश सरकारमध्ये सूक्ष्य, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे राज्यमंत्री आहेत.
राज्यमंत्री चौधरी उदयभान सिंह यांच्या विधानावर विरोधकांनी कडाडून टीका केली. काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं सिंह यांच्या विधानाचा निषेध केला. चौधरी यांचं विधान मजुरांच्या गरिबीची चेष्टा करणारं असल्याचं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अजय लल्लू म्हणाले. लोकप्रतिनिधी, सरकार मजुरांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करुन त्यांच्यावर उपकार करत नाहीत. चौधरी यांचं विधान अतिशय लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया समाजवादी पार्टीच्या प्रवक्त्या जुही सिंह यांनी दिली.
मनरेगासाठी अतिरिक्त ४० हजार कोटी देणार; केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
'आम्ही आहोत'! लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे हेल्पलाईन नंबर; लिहून ठेवा...
आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळाणार ५० लाखांचा विमा; केंद्र सरकारची मोठी घोषणा