Coronavirus: दिलासादायक! १५ तासांत ६१० रुग्णांनी केली कोरोनावर मात; रुग्णालयाने दिला डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 10:43 AM2020-04-22T10:43:42+5:302020-04-22T10:43:55+5:30
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १९ हजार ९८४ वर पोहचली आहे.
नवी दिल्ली: जगभरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही २५ लाखांवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतासह अनेक देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १९ हजरांवर पोहचली आहे. मात्र गेल्या १५ तासांत ६१० रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १९ हजार ९८४ वर पोहचली आहे. तर ६४० जणांचा मृत्यू झाला आहे. १५ हजार ४७४ जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून ३८७० लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे. तसेच गेल्या १५ तासांत देशभरात कोरोनामुळे ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर १३८३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. मात्र दिलासा देणारी बाब म्हणजे ६१० जणांनी कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वीपणे दिला असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आता ३००० हून अधिक लोकांनी कोरोनावर मात करून ही लढाई जिंकली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. मंगळवारी ५५२ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाल्याने रुग्णांची संख्या ५ हजार २१८ वर पोहोचली. तर १९ मृत्यूंची नोंद झाल्याने एकूण बळींचा आकडा २५१ झाला. त्याचप्रमाणे, मुंबईत ३५५ रुग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या ३ हजार ४५१ झाली आहे. तर शहर-उपनगरात १२ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांचा आकडा १५१ वर पोहोचला आहे. मुंबई शहर-उपनगरात कोरोनाचे २ हजार ८८७ अॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत.