Coronavirus: ...म्हणून निरोगी रुग्णांना पुन्हा होतोय कोरोना; शास्त्रज्ञांनी सांगितले कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 09:04 AM2020-04-15T09:04:39+5:302020-04-15T09:16:29+5:30
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील एका निवेदनात या संबंधित प्रकाराची नोंद घेतली आहे.
नवी दिल्ली: कोरोना व्हायरसपासून निरोगी झालेल्या रुग्णांपैकी अनेक रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वुहानमधील डॉक्टरांना कोरोनापासून निरोगी झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाली होती. त्यातच आता दिल्लीतील नोएडामध्ये देखील असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
कोरोनापासून निरोगी झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण होण्याच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नोएडा येथील दोन रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र काही दिवसांनी तिसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पुन्हा कोरोनाची लागण होण्यामागील कारण मात्र अजूनही आरोग्य विभागातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनासुद्धा समजू शकलेले नाही. मात्र कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान जी औषधं वापरली जातात, त्याचा परिणाम संपल्यानंतर पुन्हा शरीरात कोरोना विकसित होतो की काय अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेना (WHO) ने देखील एका निवेदनात या संबंधित प्रकाराची नोंद घेतली आहे. कोरोनाबाधित रुग्ण निरोगी झाल्यानंतर त्यांची दोन वेळा चाचणी करण्याची आवश्यकता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले. तसेच काहीवेळा रुग्णांच्या शरीरातील विषाणू पूर्णपणे मरण पावला नसेल, तरी अशा रुग्णाला पुन्हा कोरोना होऊ शकतो असा दावा केली जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. त्यामुळे शरीरात असलेल्या विषाणूची तपासणी केली पाहिजे असं मत आरोग्य संघटनेने व्यक्त केले आहे.
दरम्यान, पीपल्स डेलीच्या हेल्थ जर्नल लाइफ टाईम्सनेही दावा केला आहे की, वुहानमध्ये बरे झालेल्या कोरोना रूग्णांपैकी १०% रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. तसेच रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रूग्णांपैकी ८% ते १०% रुग्णांना पुन्हा कोरोना संसर्ग होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे एकठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असताना कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण होत असल्यामुळे चीनसमोर आता नवीन संकट उभं राहिलं आहे.