Coronavius : ३ मे नंतरही लॉकडाऊन वाढणार?, पंतप्रधानांसोबतच्या VC मध्ये अनेक मुख्यमंत्र्यांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 01:53 PM2020-04-27T13:53:35+5:302020-04-27T14:16:42+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फेरेन्सिंगद्वारे संवाद साधला. कोरोनासंदर्भात पंतप्रधानांकडून घेण्यात आलेली ही चौथी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंग बैठक आहे.
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेला देशव्यापी ‘लॉकडाउन’ येत्या ३ मे रोजी संपला तरी निदान कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ असलेल्या ठिकाणी तरी त्यानंतरही निर्बंध सुरू राहावेत, अशा मतापर्यंत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पं. बंगाल, पंजाब, ओदिशा व दिल्ली ही सहा राज्ये आली असल्याची माहिती आहे. आता, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सर्वच राज्यातील मुख्यमंत्र्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीतील चर्चेअंती ज्या राज्यात कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत, त्याठिकाणी लॉकडाऊन सुरुच राहणार असल्याची माहिती आहे. मोदींसोबतच्या बैठकीतून लॉकडाऊन वाढण्याचे संकेत मिळाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फेरेन्सिंगद्वारे संवाद साधला. कोरोनासंदर्भात पंतप्रधानांकडून घेण्यात आलेली ही चौथी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंग बैठक आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईतील पुढील अॅक्शन प्लॅनबाबत मोदींनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी देशातील आर्थिक स्थिती पाहता, अर्थव्यवस्थेला चालना देणे गरजेचं असल्याचं मोदींनी म्हटलं. पण, नागरिकांचे आरोग्य आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईला प्राधान्य असल्याचंही मोदींनी म्हटलं. यावेळी, अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ३ मे नंतरही लॉकडाऊन वाढविण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यामध्ये, महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा, मध्य प्रदेश, प.बंगाल आणि ओडिशा येथील मुख्यमंत्री हॉटस्पॉट विभागातील लॉकडाऊन वाढविण्यावर ठाम असल्याचं सांगितल्याची माहिती आहे.
#Update: Prime Minister Narendra Modi's video conference meeting with the Chief Ministers of all States on COVID19 situation, concludes. https://t.co/eecoedEEm8
— ANI (@ANI) April 27, 2020
देशातील अनेक राज्यांमध्ये शेतीविषयक आणि दुकानविक्रेत्यांना दुकाने खुली करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. त्यामध्ये, मॉल, चित्रपटगृहे आणि दारु दुकांना अद्यापही बंदी घातलेली आहे. सध्या महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि मध्यप्रदेश या राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे, हॉटस्पॉट असलेल्या जिल्ह्यात हे लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे समजते. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या महाराष्ट्रात असून मुंबईत मोठ्या प्रमाणात हॉटस्पॉट आहे. त्यामुळे राज्यातील मुंबई, पुणे या शहरांसह ज्याठिकाणी हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे तेथे लॉकडाऊन वाढण्याची दाट शक्यता आहे. याबाबत लवकरच घोषणाही करण्यात येऊ शकतो.
दरम्यान, मुंबईसारख्या शहरातील लॉक डाऊन इतक्या लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. हे `बंद' प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार आहे. शनिवारी मुंबईत एक दिवसात 602 कोरोना रुग्ण सापडले. राज्यात विक्रमी 811 रुग्णांची भर पडली. ही वाढत्या धोक्याची लक्षणे आहेत. धारावीसारखे कोरोनाचे `हॉट स्पॉट' परप्रांतीयांनी गच्च भरलेले आहेत, पण शेवटी त्यांची काळजी महाराष्ट्र सरकारला घ्यावीच लागेल. या परिस्थितीत परप्रांतीयांना बाहेर पडायची आणि महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून घरी पोहोचायची घाई झाली आहे. अर्थात, त्यांना बाहेर पडू न देणे हे आरोग्याच्यादृष्टीने सोयीचे आहे, पण त्यांचे काफिले झुंडीच्या झुंडीने निघणारच असतील तर केंद्र सरकारला अशा लोकांची जबाबदारी झटकता येणार नाही, असे म्हणत शिवसेनेनेही मुंबईतील लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत.