उमेदवारीसाठी नगरसेवकाच्या कोलांटउड्या!

By admin | Published: September 24, 2014 02:42 AM2014-09-24T02:42:28+5:302014-09-24T02:42:28+5:30

विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसचे माझगावचे नगरसेवक मनोज जामसुतकर यांनी स्वत:चे कार्यक्षेत्रच बदलण्याचा निर्णय घेतला आहे

Corporator Collant for candidature! | उमेदवारीसाठी नगरसेवकाच्या कोलांटउड्या!

उमेदवारीसाठी नगरसेवकाच्या कोलांटउड्या!

Next

मुंबई : विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसचे माझगावचे नगरसेवक मनोज जामसुतकर यांनी स्वत:चे कार्यक्षेत्रच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. माझगावच्या बीआयटी चाळ क्रमांक ११ मध्ये राहणारे जामसुतकर आता शिवडी मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी धडपडत आहेत.
दक्षिण मुंबईतील माझगावच्या बीआयटी चाळीत राहणाऱ्या जामसुतकर यांनी महापालिकेचे तिकीट मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर २०८ प्रभागातून त्यांना नगरसेवक होण्याचा मान मिळाला. मात्र नगरसेवक झाल्यानंतर आमदार होण्यासाठी या ठिकाणी आपली डाळ शिजणार नसल्याचे जामसुतकर यांच्या पुरते लक्षात आले. कारण त्यांचा प्रभाग मुंबादेवी आणि भायखळा अशा दोन विधानसभा मतदारसंघांत विभागलेला आहे. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे आमदार तळ ठोकून बसले आहेत.
अशा वेळी शिवडी या कमकुवत मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी जामसुतकर यांचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. मात्र त्यांच्या या प्रयत्नांमुळे काँग्रेसच्या शिवडीतील पदाधिकाऱ्यांत कमालीची नाराजी पसरली आहे. ‘कानामागून आले आणि तिखट झाले,’ अशी काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांत जामसुतकर यांच्याप्रती भावना आहे. त्यात आमदारकीसाठीही दुसऱ्या मतदारसंघात घुसखोरी करू पाहणाऱ्या जामसुतकर यांच्या काँग्रेस निष्ठेबाबतही साशंकता असल्याचे एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनरवर जामसुतकर यांचे फोटो झळकले होते. त्यामुळे आजही जामसुतकर राष्ट्रवादीचेच काम करत असल्याचा आरोप त्या पदाधिकाऱ्याने केला आहे.
मुळात निवडणूक काळात पक्षाने मतदारांसाठी वर्षभर केलेल्या कामांचा पाढा वाचून उमेदवार मते मागण्याचे काम करतात. मात्र जामसुतकर यांना शिवडीतून तिकीट दिल्यास ते स्वत:चा प्रचार सोडून मुंबादेवी आणि भायखळा मतदारसंघात काँग्रेसचा प्रचार करण्यास कितपत वेळ देतील, याबाबतही पदाधिकाऱ्यांत साशंकता आहे. याशिवाय मुंबादेवीत मनसेने प्रथमच इम्तियाज अनिस या मुस्लीम चेहऱ्याच्या रूपात उमेदवार दिला आहे. तर भायखळ्यातून चव्हाण यांचे विरोधक आणि काँग्रेसचे बंडखोर नेते रोहिदास लोखंडे हे अपक्ष निवडणूक लढत आहेत. त्यामुळे मतांचे विभाजन होऊन या दोन्ही जागांवर काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात दोन्ही आमदारांच्या मदतीला एका स्थानिक नगरसेवकाची अनुपस्थिती धोकादायक ठरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Corporator Collant for candidature!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.