संस्कृतचा निर्णय योग्यच -इराणी
By admin | Published: November 24, 2014 02:10 AM2014-11-24T02:10:22+5:302014-11-24T02:10:22+5:30
केंद्राद्वारे संचालित सुमारे ५०० केंद्रीय विद्यालयांमध्ये जर्मनऐवजी तृतीय भाषा म्हणून संस्कृत निवडण्याचा निर्णय योग्य आहे
नवी दिल्ली : केंद्राद्वारे संचालित सुमारे ५०० केंद्रीय विद्यालयांमध्ये जर्मनऐवजी तृतीय भाषा म्हणून संस्कृत निवडण्याचा निर्णय योग्य आहे आणि कितीही टीका झाली तरी आपण या निर्णयावर ठाम असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या़.
रविवारी पत्रकारांशी त्या बोलत होत्या़ शिक्षणाचे भगवेकरण होत असल्याचे आरोप त्यांनी यावेळी खोडून काढले़ जे लोक माझ्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतीक वा प्रतिनिधी असल्याचा आरोप करतात, मुळात या लोकांना आमच्या चांगल्या कामावरून जनतेचे लक्ष विचलित करायचे असते़ पण मी यासाठी तयार आहे़ चांगल्या कामासाठी कितीही टीका झाली तरी मी पचवायला सक्षम आहे़ मला यात कुठलीही अडचण नाही, असे इराणी म्हणाल्या़
२०११ साली झालेल्या एका करारानुसार, केंद्रीय विद्यालयांमध्ये तिसरी भाषा म्हणून जर्मन शिकवली जात आहे़ पण हा निर्णय घटनाबाह्य आहे़ याच्या चौकशीचे आदेश आधीच देण्यात आले आहे़ तीन भाषांचा फॉर्म्युला अतिशय स्पष्ट आहे़ संविधानानुसार तिसरी भाषा ही संस्कृत वा ८ व्या अनुसूचीत समाविष्ट असलेल्या २२ प्रादेशिक भाषांपैकी एक भाषा असू शकते़, असे इराणी म्हणाल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)