एक मत 53 हजारांचं, EC च्या अजब कारभारामुळे कपाळावर हात माराल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 01:20 PM2018-06-22T13:20:06+5:302018-06-22T13:28:00+5:30
उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची विनंती निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे.
लखनौ- निवडणुकीला लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मानलं जातं. मतदान हे श्रेष्ठदान, लोकशाही देशातील नागरिकाचं परम कर्तव्य, पवित्र अधिकार समजला जातो. तसेच जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि यशस्वी लोकशाही म्हणून भारताचे जगभरात नाव घेतले जात असले तरी काही नियमांमुळे देशाच्या तिजोरीवर चांगलाच ताण पडत आहे. 25 जून रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकांबाबत आता असाच एक मुद्दा समोर आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या एका मतासाठी 53 हजार रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.
In a letter to EC, UP Governor Ram Naik asked the body to issue standing instructions to ensure voters(for graduate legislative council polls) outside their constituencies can use postal ballots like in Lok Sabha and Assembly polls
— ANI UP (@ANINewsUP) June 21, 2018
आपण महाराष्ट्रापासून दूर राहात असल्यामुळे आपल्याला पोस्टाद्वारे मतदान करु देण्यात यावे असी विनंती उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी निवडणूक आयोगाला केली होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्राबाहेर राहाणाऱ्या नागरिकांना विधानपरिषदेच्याही निवडणुकांसाठी तशी मुभा देण्यात यावी अशीही विनंती त्यांनी आयोगाला केली होती. मात्र निवडमूक आयोगाने ही विनंती फेटाळली. आता राज्यपाल नाईक यांना स्वतः मुंबईत येऊन मतदान करावे लागेल. त्यांचा विमानप्रवास तसेच झेड प्लस सुरक्षेचा खर्च हा 53 हजारांवर जाणार असून त्यासाठी सरकारी तिजोरीतून खर्च केला जाईल.