मुलीच्या अब्रूची किंमत एक लाख रुपये! बिहारमधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 09:52 AM2023-06-10T09:52:14+5:302023-06-10T09:52:26+5:30
बलात्काऱ्याकडून एक लाख रुपये घेऊन गर्भपात करा, असे सरपंचांनी पीडितेच्या पित्याला सांगितले.
एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतने अल्पवयीन मुलीच्या अब्रूची किंमत ठरविल्याचा प्रकार समोर आला आहे. बलात्काऱ्याकडून एक लाख रुपये घेऊन गर्भपात करा, असे सरपंचांनी पीडितेच्या पित्याला सांगितले.
एका तरुणाने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यामुळे मुलगी गर्भवती झाली. पित्याने तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायतने मुलीच्या अब्रूची चक्क किंमत ठरविली. एक लाख रुपये घ्या व मुलीचा गर्भपात करा, असे सरपंचाने सांगितल्याने पीडितेच्या पित्याला धक्काच बसला.
आरोपी धमकावून मुलीशी गैरकृत्य करीत होता. तिला लग्नाचे आमिष दाखवत होता. मुलीने घाबरून घरी माहिती दिली नाही. पोटात दुखू लागले असता तिला रुग्णालयात नेल्यानंतर ती ६ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. ग्रामपंचायतकडे तक्रार केल्यानंतर सरपंचांनी एक लाख रुपये घेऊन गर्भपात करण्यास सांगितले. मी नंतर पोलिस ठाण्यात तक्रार दिली, असे पीडितेच्या पित्याने सांगितले. मुलीच्या पित्याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली, असे पोलिस उपअधिक्षक सुनील कुमार यांनी सांगितले.