खोकला, तापाने देश बेजार; पसरली साथ, काळजी घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 05:25 AM2023-03-11T05:25:25+5:302023-03-11T05:26:32+5:30
दोन रुग्णांचा मृत्यू; राज्यांना सतर्क राहण्याच्या केंद्राच्या सूचना
नवी दिल्ली : देशात कोरोनाप्रमाणे पसरत असलेल्या ‘एच३एन२’ विषाणूच्या संसर्गामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हरयाणा आणि कर्नाटकचा प्रत्येकी एक रुग्ण याला बळी पडला. देशात इन्फ्लूएन्झाची (विषाणूजन्य आजार) लाट आली असून, एच३एन२ हा विषाणू याला कारणीभूत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असले तरी यामुळे रुग्णाचा मृत्यू होण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे.
हरयाणात एच३एन२ मुळे एका रुग्णाचा (५६ वर्षे) मृत्यू झाला आहे. फुप्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णाला एच३एन२ विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. हा रुग्ण जिंद जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याचे ८ मार्चला निधन झाले. तर, कर्नाटकमध्ये हिरे गौडा (८२ वर्षे) यांचा १ मार्चला मृत्यू झाला. चाचणीसाठी पाठवलेल्या नमुन्यात ‘एच३एन२’ची लागण झाल्याची पुष्टी झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
लोकांनी घाबरू नये : तज्ज्ञ
एच३एन२च्या संसर्गामुळे दोन रुग्ण दगावले असले तरी लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. हा संसर्ग पसरू नये म्हणून योग्य त्या प्रतिबंधक उपाययोजना लोकांनी कराव्यात, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
अपोलो हॉस्पिटल्सच्या इंटर्नल मेडिसिन या विभागातील डॉक्टर अनुराग अग्रवाल यांनी सांगितले की, एच३एन२ या विषाणूमुळे कोरोनासारखी मोठी साथ पसरण्याची शक्यता दिसत नाही. एच३एन२चा संसर्ग झालेल्यांपैकी फक्त ५ टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे.
लक्षणे काय?
एच३एन२ या विषाणूच्या संसर्गामध्ये ताप, सर्दी, घसा खवखवणे, डोळ्यांत जळजळ व खोकला अशी लक्षणे दिसतात.
ताप दोन-तीन दिवसांत बरा होतो. पण, घशाचा त्रास थोडा जास्त काळ राहू शकतो.
एवढेच नाहीतर, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने इतरांनाही बाधा होऊ शकते.
लहान मुले, वृद्धांनी अधिक काळजी घ्यावी
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय म्हणाले की, लहान मुले तसेच एकाहून अधिक व्याधींनी ग्रस्त असलेल्या वृद्ध व्यक्तींना विशिष्ट मोसमात विषाणूजन्य आजार होण्याची अधिक शक्यता असते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने म्हटले होते की, हात स्वच्छ धुवावेत, मास्क घालावा