नीट-यूजीच्या समुपदेशनास विलंब; प्रक्रिया सुरू होणार जुलै महिन्याच्या अखेरीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 05:37 AM2024-07-07T05:37:14+5:302024-07-07T05:37:25+5:30
ही समुपदेशन प्रक्रिया जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार होती, पण आता त्याला विलंब होणार आहे.
नवी दिल्ली : नीट-यूजी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांच्या समुपदेशनाला जुलै महिन्याच्या अखेरीपासून प्रारंभ होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी शनिवारी सांगितले. मात्र, त्याची तारीख जाहीर करण्यात आली नाही. या आधी ही समुपदेशन प्रक्रिया जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार होती, पण आता त्याला विलंब होणार आहे. काही वैद्यकीय महाविद्यालयांना समुपदेशनासाठी परवानगी पत्र देण्याचे काम अद्याप सुरू आहे. यंदाच्या वर्षी नीट-यूजीमध्ये गैरप्रकार झाल्याने देशभरात निषेध व्यक्त करण्यात आला होता. नीट-यूजीची झालेली परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशीही मागणी अनेक विद्यार्थी, संस्था, तसेच पक्षांनी केली आहे. २०२४ या वर्षाकरिता सीट मॅट्रिक्स (रिकाम्या जागांचा तक्ता) यूजीसाठी जुलैपर्यंत तर व पीजीसाठी ऑगस्टच्या मध्यापर्यंत अंतिम करण्यात येईल असे एनएमसीने कळविले आहे. त्यानुसार एमसीसी समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
फेरपरीक्षेस विरोध
एनटीएने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, एकदा पार पडलेली नीट-यूजी परीक्षा रद्द केली, तर त्यामुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा येऊ शकते.
सर्वोच्च न्यायालयाने समुपदेशन पुढे ढकलण्यास जूनमध्ये नकार दिला होता. ही प्रक्रिया दोन दिवस थांबविण्याचे निर्देश मागणाऱ्या याचिकेवर सुनावणीवेळी हे घडले.
दोन्ही प्रकरणांचा तपास
एमबीबीएस, बीडीएस, आयुष व अन्य संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एनटीए दरवर्षी नीट-यूजी परीक्षा घेते. यंदा ५ मे रोजी झालेल्या परीक्षेचा पेपर फुटला. त्यानंतर, यूजीसी-नेटची परीक्षाही रद्द करण्यात आली होती. या दोन्ही प्रकरणांचा सीबीआय तपास करत आहे.