कोरोनाच्या सावटाखाली 5 विधानसभांसाठी आज मतमोजणी, महाराष्ट्राचे लक्ष पंढरपूरकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 06:52 AM2021-05-02T06:52:24+5:302021-05-02T06:53:04+5:30
महाराष्ट्राचे लक्ष पंढरपूरकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या सावटामध्ये ४ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभांसाठी मतदान पार पडले. त्याची मतमोजणी रविवार, २ मे रोजी होणार असून, मतदारांनी कोणाला कौल दिला, हे उघड होणार आहे. मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार असून, त्या दरम्यान कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. दुपारपर्यंत विधानसभांचे चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज आहे.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. आसाममध्ये तीन तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ८ टप्प्यांमध्ये मतदान झाले. महाराष्ट्रात पंढरपूर विधानसभा मतदारसंघासह देशभरात एकूण ४ लोकसभा व १३ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही रविवारी होणार आहे.
काय सांगतात
एक्झिट पोल्स?
n मतदान संपल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या एक्झिट पोल्समध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल यांच्यात काटे की टक्कर होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
n ममता बॅनर्जी याच सरकार स्थापन करतील, अशी शक्यता जवळपास सर्वच एक्झिट पोल्समधून व्यक्त करण्यात आली आहे.
n आसाममध्ये भाजप आणि केरळमध्ये डावी आघाडी सत्ता कायम राखतील.
n तामिळनाडूत सत्तांतर होऊन डीएमके सत्ता स्थापन करेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
n पुदुच्चेरीमध्येही सत्तांतर होऊन एनडीए सरकार स्थापन करेल, असा अंदाज वर्तविला आहे.
मतमोजणी केंद्रांवर कठोर निर्बंध
n मद्रास उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी निर्बंध लावले आहेत. उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रांवर प्रवेशासाठी आरटी-पीसीआर किंवा रॅपिड अँटिजन चाचणी निगेटिव्ह बंधनकारक केली आहे.
n तसेच निवडणूक आयोगाने निकालानंतर विजयी मिरवणुकांवर बंदी घातली आहे. याशिवाय विजयाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी उमेदवाराने दोनपेक्षा अधिक व्यक्ती सोबत नेऊ नयेत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
बहुमताचा आकडा
राज्य जागा बहुमत
प. बंगाल २९४ १४८
तामिळनाडू २३४ ११८
केरळ १४० ७१
आसाम १२६ ६४
पुदुच्चेरी ३० १७
(प. बंगालमध्ये २९२
जागांवर झाले मतदान)