देशाने कोरोनाच्या ७ लाख चाचण्यांचा टप्पा ओलांडला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 04:53 AM2020-04-29T04:53:31+5:302020-04-29T04:53:41+5:30
जानेवारी महिन्यात कोविड-१९ ची पहिली चाचणी घेतली गेली होती. देशाने दररोज ५० हजार चाचण्या करण्याचाही नवा विक्रम केला.
नवी दिल्ली : भारताने मंगळवारी कोविड-१९ च्या सात लाखांपेक्षा जास्त चाचण्या करून नवा विक्रम स्थापन केला. देशात यावर्षी जानेवारी महिन्यात कोविड-१९ ची पहिली चाचणी घेतली गेली होती. देशाने दररोज ५० हजार चाचण्या करण्याचाही नवा विक्रम केला.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार २८ एप्रिलच्या सकाळी ९ वाजेपर्यंत ७,१६,७३३ चाचण्या केल्या गेल्या, तसेच गेल्या २४ तासांत मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत ५०,९१४ चाचण्या झाल्या. देशात झालेल्या एकूण चाचण्यांनी मंगळवारी गाठलेली संख्या ही गेल्या फक्त २२ दिवसांत त्यात सातपट वाढीमुळे असून, जानेवारीपासूनचा विचार केला, तर त्यात १५० पट वाढ झालेली आहे. ६ एप्रिल रोजी एकूण चाचण्या ९६,२६४ होत्या.
मंगळवारची संख्या ७,१६,७३३ असून, हा एक नवा विक्रमच आहे. झालेल्या चाचण्या या निदान होण्यासाठी रिव्हर्स ट्रान्सस्क्रिप्शन-पॉलिमेरेस चेन रिअॅक्शन (आरटी-पीसीआर) कीटचा उपयोग करून झालेल्या आहेत व ही चाचणी अतिशय अचूक मानली जाते. या चाचण्यांच्या संख्येत अँटीबॉडी टेस्ट कीटस्ने केलेल्या चाचण्यांचा समावेश नाही. कारण ही चाचणी सदोष आढळली व त्यामुळे फेटाळली गेलेली आहे.
देशात रेड झोन जिल्ह्यांची संख्या २५ एप्रिल रोजी १७० होती ती १६६ वर आली आणि येत्या दोन दिवसांत ती १५० होण्याची शक्यता आहे. रेड झोन जिल्हे हे तामिळनाडूत सर्वात जास्त ३८ पैकी २२, त्यानंतर महाराष्ट्रात ३६ पैकी १४ आहेत. महाराष्ट्रात फक्त सात जिल्हे ग्रीन झोन आहेत. आंध्र प्रदेशमध्ये १४ पैकी १२ जिल्हे हे रेड झोन, तर दिल्लीतील ११ पैकी १० जिल्हे रेड झोन आहेत. ११ वा जिल्हा आॅरेंज झोन आहे. देशात ७२० जिल्हे असून, त्यातील १६६ रेड, २६६ आॅरेंज आणि ३४८ ग्रीन झोनमध्ये आहेत. गोव्याच्या दोन जिल्ह्यांपैकी एक आॅरेंज, तर दुसरा ग्रीन आहे. गुजरातमध्ये ३३ जिल्ह्यांपैकी ६ रेड, १४ आॅरेंज, तर ग्रीनमध्ये १३ आहेत. केंद्र आणि राज्य सरकारे रेड आणि आॅरेंज झोनमध्ये व्यत्यय न येऊ देता ग्रीन झोनमध्ये लॉकडाऊन कसा शिथिल करता येईल यासाठी एक समान धोरण आखत आहेत.