आंबेडकरांनी व्यक्त केलेल्या चिंतांपासून देश मुक्त नाही
By admin | Published: March 16, 2017 12:28 AM2017-03-16T00:28:42+5:302017-03-16T00:28:42+5:30
भारताची राज्यघटना सादर केल्यानंतर डॉ.आंबेडकरांनी लोकशाहीच्या सुरळीत वाटचालीबद्दल, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वसमावेशकते बाबत काही चिंता व्यक्त केल्या होत्या
सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
भारताची राज्यघटना सादर केल्यानंतर डॉ.आंबेडकरांनी लोकशाहीच्या सुरळीत वाटचालीबद्दल, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वसमावेशकते बाबत काही चिंता व्यक्त केल्या होत्या. विद्यमान काळात त्या चिंतांपासून आजही देश मुक्त झालेला नाही, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकरांनी संपादित केलेल्या ‘द इसेन्शिअल आंबेडकर’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळयात केले.
दिल्लीच्या मावळणकर सभागृहात संपन्न झालेल्या या प्रकाशन सोहळयात डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह शरद पवार, पी.चिदंबरम, सिताराम येचुरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. मुणगेकर यांनी सलग ७ वर्षे डॉ. आंबेडकरांच्या १७ हजार ५00 पानांच्या लिखित चिंतनाचे ४३५ पानांमधे संपादन केले व ज्ञानसाधनेसाठी अलौकिक ग्रंथाची भर घातल्याबद्दल सर्वच वक्त्यांनी मुक्तकंठाने त्यांची प्रशंसा केली.
आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन करतांना पी. चिदंबरम म्हणाले, अर्थशास्त्र, राज्यघटना, कायदा, राज्यशास्त्र, सामाजिक सुधारणांसह आधुनिक भारताच्या उभारणीत कोणत्या योजनांना अधिक महत्व द्यायला हवे, याचे प्रदीर्घ चिंतन शब्दबध्द करणारी आंबेडकरांसारखी व्यक्ती माझ्या पहाण्यात नाही. आंबेडकर वैज्ञानिक नसले त्यांची तुलना आईन्स्टाईन अथवा न्यूटन यांच्या बुध्दिमत्तेशीच करावी लागेल. आंबेडकरांनी शोषित, वंचित व दलित समाजाच्या उत्थानासाठी आयुष्यभर संघर्ष केला. १९५६ साली त्यांचे महानिर्वाण झाल्यानंतर ५३ वर्षात भारताच्या सामाजिक स्थितीत दुर्देवाने फारसा फरक पडलेला दिसत नाही. अन्यथा हैद्राबाद विद्यापीठात रोहित वेमुलाची आत्महत्या अथवा गुजराथच्या उना येथे मृत गायींचे कातडे काढणाऱ्या दलितांना जी भयंकर शिक्षा जमावाने दिली तशा दुर्देवी घटना घडल्या नसत्या.
डॉ. आंबेडकर केवळ समाज सुधारक नव्हते तर अर्थकारणाबद्दलही त्यांनी सखोल चिंतन केले. ते आजही मार्गदर्शक ठरू शकते, असे नमूद करीत शरद पवार म्हणाले, प्रत्येक राज्याने आवश्यक प्रमाणात वीजनिर्मिती करावी व अतिरिक्त वीजनिर्मितीची ज्या राज्यांना गरज आहे, त्यांना ती पुरवता यावी, यासाठी नॅशनल ग्रीडची आंबेडकरांनी उभारणी केली. पाण्याच्या समस्येसाठी जलनीती आखतांना भाक्रा नानगलसारख्या धरणांच्या निर्मितीची संकल्पनाही त्यांच्या कारकिर्दीतच ठरली.
प्रकाशन सोहळयाचे स्वागत रूपा पब्लिकेशनचे अतिश मेहरा यांनी केले. प्रास्ताविकात मनमोहनसिंगांचा गौरवपूर्ण उल्लेख करीत डॉ. मुणगेकर म्हणाले, नियोजन आयोगात व राज्यसभेत डॉ. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यातला सुवर्णकाळ अनुभवण्याचा मला योग आला. जवळपास दिड तास चाललेल्या या सोहळ्यात सर्वच वक्त्यांची भाषणे लक्षवेधी झाली.