देशातील सर्वात श्रीमंत आमदार लढवणार कर्नाटकची निवडणूक; पाच वर्षांत वाढली 600 कोटींची संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 12:18 PM2023-04-18T12:18:42+5:302023-04-18T12:19:28+5:30
Karnataka Assembly Election 2023 : देशात 4000 हून अधिक आमदार आहेत, त्यापैकी कुणाकडेही या उमेदवाराइतकी संपत्ती नाही.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काउंटडाऊन सुरू झाले आहे. काँग्रेस आणि भाजपशिवाय राज्यातील इतर पक्षांनीही उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने देशातील सर्वात श्रीमंत आमदार असलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. एन नागराजू असे या उमेदवाराचे नाव आहे. देशात 4000 हून अधिक आमदार आहेत, त्यापैकी कुणाकडेही या उमेदवाराइतकी संपत्ती नाही. एन नागराजू यांनी सोमवारी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले. यामध्ये त्यांनी आपले उत्पन्न आणि स्त्रोत याबद्दल माहिती दिली आहे.
देशातील सर्वात श्रीमंत आमदार
देशातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक असलेले कर्नाटकचे मंत्री एन नागराजू यांनी राज्यातील 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करताना एकूण 1,609 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. त्यांनी सोमवारी होसकोटे विधानसभा मतदारसंघातून सत्ताधारी भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. एन नागराजू यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्वत:ला शेतकरी आणि व्यापारी असल्याचे सांगितले आहे. त्यांची पत्नी एम शांताकुमारी या गृहिणी आहेत, त्यांच्याकडे एकूण 536 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. पती-पत्नी दोघांची स्थावर मालमत्ता 1,073 कोटी रुपये आहे.
2020 मध्ये 1220 कोटी रुपयांची संपत्ती
नागराजू सध्या एमएलसी आहेत. जून 2020 मध्ये विधानपरिषद निवडणूक लढवताना त्यांनी जवळपास 1,220 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. तसेच सध्याच्या प्रतिज्ञापत्रात पती-पत्नी दोघांवर एकूण 98.36 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे घोषित केले आहे. इयत्ता नववी पर्यंत शिकलेल्या एन नागराजू यांनी त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत शेती, घर, व्यवसाय आणि इतर स्त्रोत दिले आहेत आणि त्यांच्या पत्नीकडे देखील घराची संपत्ती आणि इतर स्त्रोत आहेत.
संपत्तीत 59 टक्के वाढ
पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2018 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर होसकोटे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी आपली एकूण संपत्ती 1,015 रुपये असल्याचे घोषित केले होते. याचाच अर्थ एन नागराजू यांच्या संपत्तीत पाच वर्षांत जवळपास 600 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. टक्केवारीत पाहिल्यास नागराजू यांच्या संपत्तीत 59 टक्के वाढ झाली आहे. जी खूप जास्त आहे.
काँग्रेसशी नाते तोडून भाजपमध्ये प्रवेश
एन नागराजू हे 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून होसकोटे विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. ते 17 आमदारांपैकी एक होते ज्यांनी पक्षाची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. ज्यामुळे 2019 मध्ये काँग्रेस-जेडी(एस) युतीचे सरकार पडले. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत ते होसकोटे येथून अपक्ष उमेदवार शरथ बचेगौडा यांच्याविरुद्ध पराभूत झाले, जे आता काँग्रेससोबत आहेत. दोघेही एकमेकांचे कडवे प्रतिस्पर्धी बनले असून, पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.