केंद्राच्या हलगर्जीपणामुळे देश बुडत आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 05:20 AM2021-05-08T05:20:31+5:302021-05-08T05:20:43+5:30
सोनिया गांधींचे केेंद्र सरकारवर टीकास्त्र; सर्वपक्षीय बैठक बोलवा
नवी दिल्ली : कोरोनाचे संकट हताळण्यासाठी सक्षम आणि दूरदर्शी नेतृत्वाची गरज आहे. मात्र, मोदी सरकारच्या हलगर्जीपणामुळे देश बुडत असल्याची कडाडून टीका काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. विषाणूविरुद्धचा लढा आता राजकीय मतभेदांच्या पलीकडे गेला असून देशाला आता एकत्रपणे लढावे लागेल, अशी भूमिका सोनिया गांधींनी मांडली. मोदी सरकारने कोरोनाचे संकट हाताळण्यासाठी तत्काळ सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याची मागणीही सोनिया गांधी यांनी केली आहे.
काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या ऑनलाईन बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या. मोदी सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या, देशाच्या प्रमुख राजकीय नेतृत्वाला नागरिकांप्रती कसलीही सहानुभूती नसून केंद्र सरकारने जनतेला अपयशी केले आहे. देशाची यंत्रणा अपयशी झालेली नाही. भारताची बलस्थाने आणि संसाधनांचा योग्य वापर करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. हा लढा सरकारविरुद्ध नसून कोरोनाविरुद्ध आहे. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी कृती आणि उत्तरदायित्व ठरविण्यासाठी एक स्थायी समिती स्थापन करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीबाबत सोनिया गांधींनी प्रथमच मत व्यक्त केले.