देशाच्या सशस्त्र सेनांना आता अनेक आघाड्यांवर लढावे लागेल: हवाईदल प्रमुख राकेश सिंग भदाैरिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 08:07 PM2020-11-07T20:07:58+5:302020-11-07T20:51:39+5:30
भारतीय सशस्त्र दले कुठल्या ही प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम आहे.
पुणे: देशात लष्करी बदलांना सुरूवात झाली आहे. देश कुठल्या ही प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम आहे. मात्र, आज युद्धाचे स्वरूप बदलले आहे. हायब्रीड युद्ध प्रणालीमुळे देशाच्या सशस्त्र सेनांना अनेक आघाड्यांवर लढावे लागेल, हे स्पष्ट असून त्यांनी यासाठी तयार राहावे, असे प्रतिपादन भारतीय हवाईदल प्रमुख एअर मार्शल राकेश सिंग भदाैरिया यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनिच्या १३९ च्या दीक्षांत संचलन सोहळा शनिवारी खेत्रपाल परेड मैदानावर पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
भदौरिया म्हणाले, तांत्रिक प्रगतीमुळे आज युद्धाचे स्वरूप बदलत आहे. एक उत्कृष्ट लष्करी अधिकारी बनत असताना बदलत्या जागतिक भूराजकीय परिणामांचा शेजारी राष्ट्रावर होणारा प्रभाव ओळखणे काळाजी गरज आहे. कारण याचा थेट परिणाम देशाच्या संरक्षण सज्जतेवर होत असतो. मात्र, भारतीय सशस्त्र दले कुठल्या ही प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम आहे. आज देशात मोठ्या प्रमाणात लष्करी बदल होत आहेत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांची नेमणूक आणि डीएमएची स्थापना हे त्याचे उदाहरण आहे. अनेक आघाड्यांवर लढण्यासाठी ज्ञान, समर्पण, वचनबद्धता आणि त्याग आणि नेतृत्व यांची सांगड घालणे महत्वाचे आहे. कारण देशाला तुमच्याकडून खूप आशा आहेत.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १३९ तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा...
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १३९ तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळ्यात एकुण ५४० छात्र सहभागी झाले होते. यातील ३०२ छात्र हे १३९ तुकडीचे होते. यातील २२२ छात्र हे लष्कराचे, ४२ छात्र नौदलाचे आणि ३५छात्र हे हवाईदलातील होते. याशिवाय १७ मित्रदेशांच्या छात्रेही सोहळ्यात सहभागी झाले होते. सुखोई ३० विमानांनी फ्लायपास करत यावेळी विद्यार्थ्यांना मानवंदना दिली. तर सारंग या हेलिकॉप्टरने चित्तथरारक हवाई कवायती सादर केल्या.