जनतेला सवलती मिळण्याच्या शक्यता, आजच्या भाषणाकडे देशाचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 06:59 AM2020-04-14T06:59:34+5:302020-04-14T06:59:40+5:30
पंतप्रधानांच्या आजच्या भाषणाकडे देशाचे लक्ष
नवी दिल्ली: देशव्यापी लॉकडाउनच्या शेवटच्या दिवशी म्हणजे उद्या मंगळवारी सकाळी १० वाजता पंतप्रधान मोदी पुन्हा टीव्हीवरून देशाला उद्देशून भाषण करणार असून, त्यात ते देशव्यापी लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्याची घोषणा करतील, हे जवळपास निश्चित आहे. मात्र शेतकरी, कामगार व ग्रामीण लोकांसाठी ते काही सवलती, पॅकेज वा घोषणा करतील, असा अंदाज आहे.
बुधवारनंतर देशात लॉकडाऊन कायम राहिलाच तरी त्याचे स्वरूप कसे असेल हे मोदी स्पष्ट करतील, अशी अपेक्षा आहे. कदाचित मोदी लॉकडाऊनने त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी व थंडावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी एखादे मेगा पॅकेज जाहीर करतील, असेही जाणकारांना वाटते. शेतीची कामे आता सुरू होतील. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर यांच्यासाठी ते काय घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिवाय उद्योग व उत्पादन सुरू होणे आवश्यक असून, त्यासाठी ते काही निर्बंध शिथिल करतील, अशी अपेक्षा आहे.
७ राज्यांत लॉकडाउन
लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्र, पंजाब, ओडिशा, प. बंगाल, दिल्ली, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला. भाजपशासित राज्यांनी मात्र तो निर्णय घेतलेला नाही. मोदी यांच्या उद्याच्या भाषणानंतर ती राज्ये निर्णय घेतील.