विदेशी पर्यटकांना देशाच्या सीमा झाल्या खुल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 07:09 AM2021-11-16T07:09:37+5:302021-11-16T07:10:06+5:30
क्वारंटाइनची अट नाही, ९९ देशांनाच सवलत
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोनाकाळातील सुमारे २० महिन्यांच्या कालावधीनंतर भारताने आता विदेशी पर्यटकांना पुन्हा प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रसार कमी झाला असून लसीकरणाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे हा सरकारने हा निर्णय घेतला.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात केंद्र सरकारने विदेशी पर्यटकांना व्हिसा देणे बंद केले होते. पण आता या पर्यटकांना भारतात येताना क्वारंटाइन होण्याची अटही काढून टाकली. मात्र ही सवलत ९९ देशांतील पर्यटकांनाच आहे. या पर्यटकांनी भारतात आल्यानंतर स्वत:च्या प्रकृतीकडे १४ दिवस बारीक लक्ष ठेवावे अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. गेल्या महिन्यापासून चार्टर्ड फ्लाइटने येण्यास विदेशी पर्यटकांना केंद्र सरकारने परवानगी दिली होती. आता पर्यटकांना सोमवारपासून प्रवासी विमानांतून ही भारतात विविध ठिकाणी जाण्याची परवानगी दिली. गेल्या काही आठवड्यांपासून पर्यटकांनी विविध पर्यटनस्थळे फुलून गेली आहेत. गोवा, हिमाचल प्रदेश, लडाख, उत्तराखंड आदी ठिकाणी देशी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. भारतातील लसीकरण मोहिमेत आजवर ११० कोटींपेक्षा अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. कोरोनाचा झालेल्यांपैकी बहुतांश नागरिक बरे झाल्याचे अँटीबॉडी सर्वेक्षणातून दिसून आले आहे.