'देशाचा जीडीपी 8 वरुन 3.1 टक्क्यांवर आला, तेही देवाचीच करणी आहे का?'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 03:47 PM2020-08-28T15:47:59+5:302020-08-28T15:48:38+5:30
कोरोनाला देवाची करणी म्हटल्यानं सीतारामन यांची सोशल मीडियातून अनेकांनी खिल्ली उडवली आहे. जवळपास सहा महिन्यांपूर्वी देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून देशाचा जीडीपी घसरला आहे.
नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. आधीच अडचणीत असलेली भारताची अर्थव्यवस्था कोरोनामुळे आणखी संकटात सापडली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरील समस्यांवर बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनाला 'देवाची करणी' म्हटलंय. कोरोनाला थेट देवाची करणी म्हणणाऱ्या सीतारामन सोशल मीडियावर ट्रोल झाल्या आहेत. तर, त्यांच्याच पक्षातील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही त्यांना खडे बोल सुनावले आहेत. गेल्या 5 वर्षात कमी झालेला जीडीपी हाही देवाचीच करणी का? असा सवालही स्वामींनी विचारला आहे.
कोरोनाला देवाची करणी म्हटल्यानं सीतारामन यांची सोशल मीडियातून अनेकांनी खिल्ली उडवली आहे. जवळपास सहा महिन्यांपूर्वी देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून देशाचा जीडीपी घसरला आहे. जीएसटीमधून सरकारला अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचं आकडेवारीतून अनेकदा समोर आलं आहे. मग ही सगळी पण देवाची करणीच आहे का? आणि असेल तर मग कोणत्या देवाची? असे सवाल सीतारामन यांना सोशल मीडियावरून विचारले जात आहेत. माजी केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांनीही हाच प्रश्न ट्विटरवरुन विचारला आहे.
I am reliably informed that FM N. Sitharaman told a meeting that COVID-19 is an act God!! I will post the video soon. Was the decline in annual growth rate in GDP from 8 % in FY 15 to (1st Qtr 2020) 3.1 % pre-C0VID, also an act of God ?
— Subramanian Swamy (@Swamy39) August 28, 2020
राज्यसभा खासदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन निर्मला सितारमण यांचे स्टेटमेंट चुकीचं असल्याचं म्हटलंय. कोरोना ही दैवी नाही, तर नैर्सगिक आपत्ती आहे. इंग्रजीत यास नॅचरल डिजास्टर तर हिंदीत प्राकृतिक आपदा असे म्हटले जाते. देव कधीही कुठलीच आपत्ती घडवत नसतो. त्यामुळे, कोरोनाला अॅक्ट ऑफ गॉड म्हणता येणार नाही, असे स्वामींनी म्हटलंय. तसेच, गेल्या 5 वर्षांत म्हणजे 2015 पासून दरवर्षी देशाचा जीडीपी घटत आहे, 2015 साली 8 टक्क्यांवर असलेला जीडीपी 3.1 टक्क्यांवर आला हेही दैवीच आहे का? असा प्रश्नही स्वामींनी केला आहे. स्वामी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सितारमण यांचे व्हिडिओही शेअर केले आहेत.
अवधूत वाघ यांच्या ट्विटची चर्चा
सीतारामन यांना 'देवाची करणी' विधानावरून लक्ष्य करताना अनेकांनी भाजपाचेच प्रवक्ते अवधूत वाघ यांच्या ट्विटचा आधार घेतला आहे. त्यामुळे वाघ यांनी दोन वर्षांपूर्वी केलेलं ट्विट अचानक चर्चेत आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचे ११ वे अवतार असल्याचं ट्विट अवधूत वाघ यांनी १२ ऑक्टोबर २०१८ रोजी केलं होतं. त्यांचं हे ट्विट आता व्हायरल झालं आहे. कोरोना देवाची करणी आणि पंतप्रधान मोदी विष्णूचे अवतार यांचा संबंध सोशल मीडियावर अनेकांनी जोडला आहे.
काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?
काल वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक झाली. त्यानंतर सीतारामन यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कोरोनाचा उल्लेख 'देवाची करणी' असा केला. 'कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो, असं सीतारामन म्हणाल्या. यावेळी त्यांनी राज्यांना दोन पर्याय दिले. 'आरबीआयशी सल्लामसलत करून राज्यांना उचित व्याज दरानं ९७ हजार कोटी रुपये दिले जाऊ शकतात. या पैशाची सेस कलेक्शनच्या माध्यमातून ५ वर्षांनी परतफेड केली जाऊ शकते,' असा पहिला पर्याय त्यांनी दिला. 'या पूर्ण वर्षातील जीएसटीची परतफेडीतील तफावत आरबीआयचा सल्ला घेऊन उधारीच्या माध्यमातून पूर्ण केली जाऊ शकते,' असा दुसरा पर्यायदेखील त्यांनी सुचवला.